वैरागड बनले अवैध दारूचे केंद्र
By Admin | Updated: January 18, 2015 22:42 IST2015-01-18T22:42:19+5:302015-01-18T22:42:19+5:30
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. अवैध दारूविक्रीचे जिल्ह्यातील सर्वात मोठे केंद्र आरमोरी तालुक्यातील वैरागड असल्याची माहिती पुढे आली आहे.

वैरागड बनले अवैध दारूचे केंद्र
पोलिसांचे विक्रेत्यांना अभय : धानोरा, कुरखेडा तालुक्यात होतो पुरवठा
गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. अवैध दारूविक्रीचे जिल्ह्यातील सर्वात मोठे केंद्र आरमोरी तालुक्यातील वैरागड असल्याची माहिती पुढे आली आहे. वैरागड येथूनच आरमोरी, धानोरा, कुरखेडा या तीन तालुक्यांना मुबलक प्रमाणात दारूचा पुरवठा अवैधरित्या केला जात आहे. या व्यवसायात गुंतलेल्यांनी आरमोरी पोलीस ठाण्यालाही आपल्या कब्जात घेतले की काय अशी परिस्थिती या भागात दिसून येत आहे.
१९९३ मध्ये राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी घोषीत केली. मात्र गावागावात दारूची अवैध विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. महिला, पुरूष, वृध्द, तरूण तसेच शाळकरी मुलेही आता दारूच्या आहारी गेले आहे. जिल्ह्यात दारूबंदी अंमलबजावणी यंत्रणा थंड झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागाला दारू पुरवठा करणारे मुख्य केंद्र आरमोरी तालुक्यात वैरागड येथे सुरू झाले आहे. येथूनच कुरखेडा, आरमोरी, धानोरा या तीन तालुक्यांना देशी, विदेशी दारूचा अवैध पुरवठा केला जातो. या व्यवसायात स्थानिक विक्रेतेच गुंतलेले आहेत. दिवसाढवळ्या आलीशान वाहनातून दारूचा पुरवठा या तिनही तालुक्यातील गावांमध्ये केला जात आहे. पोलीस प्रशासनाला याची माहिती असली तरी पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका ठेवली आहे. या अवैध दारूविक्रीमुळे या भागात गावागावात महिलांना प्रचंड मानहानी सहन करावी लागत आहे. दारूच्या नशेत वैरागडजवळ गतवर्षी मरेगाव येथे एका इसमाने आपल्या पत्नी आणि मुलाला पेटवून दिल्याची घटना घडली होती. कुटुंब कलाहाच्या अनेक घटना दारूमुळे घडत आहे. मात्र पोलीस प्रशासन वैरागडच्या या दारूविक्रेत्याला प्रचंड अभय देण्याचे काम करीत आहे. तंटामुक्त समित्यांनी दारूविक्रेत्याच्या विरोधात तक्रारी केल्या तरीही पोलीस प्रशासन दखल घेत नाही, अशी माहिती अनेक गावातील समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. या भागात गावागावात चौकांमध्ये खुलेआम दारूची विक्री दिवसा व रात्री केली जात आहे. यामागे वैरागडचा ठोक विक्रेताच कारणीभूत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. मात्र पोलीस प्रशासन थातूरमातूर कारवाई करून या व्यवसायिकाला अभय देण्याचे काम करीत आहे. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी लक्ष घालून अवैध दारूविक्री थांबवावी, अशी मागणी आहे.