शिफारशीपेक्षा जास्त बियाणे वापरा
By Admin | Updated: July 5, 2014 23:35 IST2014-07-05T23:35:29+5:302014-07-05T23:35:29+5:30
जुलै महिन्याचे पाच दिवस लोटूनही पावसाचा पत्ता नाही. १० जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या वाणांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

शिफारशीपेक्षा जास्त बियाणे वापरा
पाऊस लांबला : कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला
गडचिरोली : जुलै महिन्याचे पाच दिवस लोटूनही पावसाचा पत्ता नाही. १० जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या वाणांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र १ लाख ६६ हजार हेक्टर एवढे आहे. यापैकी १ लाख ४९ हजार २६० हेक्टरवर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. २ जुलैपर्यंत केवळ ५ हजार ६६४ हेक्टरवर पऱ्हे टाकण्यात आले आहे. तर ८ हजार ५४८.८० हेक्टर क्षेत्रावर आवत्याची पेरणी करण्यात आली आहे. सोयाबीनच्या एकूण ६ हजार ३२० हेक्टरपैकी ३४१.९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कपासीच्या १२८० हेक्टरपैकी १९६ हेक्टरवर लागवड झाली आहे. एकूण क्षेत्राच्या फक्त ११ हजार २६४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हे प्रमाण ६.७८ टक्के ऐवढे आहे. आजपर्यंत केवळ २९ टक्केच पाऊस पडला आहे.
धानाचे पऱ्हे १० जुलैपर्यंत टाकल्यास उत्पादनावर फारसा प्रतीकूल परिणाम होणार नाही. मात्र १० जुलैनंतरही पाऊस न पडल्यास कमी कालावधीत येणाऱ्या धानपिकाच्या वाणांची निवड करावी. दरवर्षीच्या नियोजनापेक्षा बियाणांचा वापर जास्त करावा. ज्या शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले आहेत. पाऊस न पडल्यामुळे बियाण्यांची उगमक्षमता कमी होईल. त्याचबरोबर काही धानाची रोपे करपण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी अतिरिक्त पऱ्हे टाकावे, जेणेकरून रोवणीच्या वेळेवर रोपे कमी पडणार नाहीत. उशिरा पेरणी केलेल्या धान रोपांची मुळे रोवणीपूर्वी क्लोरोपायरीफॉस २० टक्के, ईसी १० मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या मिश्रणात बुडवावी, त्यानंतर रोवणी करावी. रोवणीनंतर १० ते २० दिवसांनी याच मिश्रणाची फवारणी करावी. जेणेकरून गादमाशी, पाने गुंडाळणारी अळी यापासून संरक्षण करता येईल. ८ जून ते १५ जून या कालावधीत उशीरा येणाऱ्या वाणांची लागवड केली गेली असेल तर अशा शेतकऱ्यांना १० ते २० जुलै या कालावधीत रोवणी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. मात्र पऱ्हे टाकले आहेत अशांनी सायंकाळी धारीने पाणी द्यावे. १५ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास ज्या जमिनीत कापूस व सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. अशा शेतकऱ्यांनी उडीद, मूग, सुर्यफूल, तीळ या पिकांची लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांकडे ओलीताचे सोय आहे. अशा शेतकऱ्यांनी रोवणी सुरूवात करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (नगर प्रतिनिधी)