अनियंत्रीत वाहतुकीने चार जणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:51 IST2019-04-17T23:51:22+5:302019-04-17T23:51:48+5:30
दुर्गम भागात वाहनांची कमतरता असल्याने एका वाहनात २० ते २५ प्रवाशी बसवून नेले जातात. याकडे पोलीस विभागही दुर्लक्ष करीत असल्याने अनियंत्रीत वाहतुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. याच अनियंत्रीत वाहतुकीमुळे आलापल्ली-भामरागड मार्गावर कोडसेपल्ली गावाजवळ बुधवारी ११ वाजताच्या सुमारास अपघात झाला.

अनियंत्रीत वाहतुकीने चार जणांचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी/आलापल्ली/पेरमिली : दुर्गम भागात वाहनांची कमतरता असल्याने एका वाहनात २० ते २५ प्रवाशी बसवून नेले जातात. याकडे पोलीस विभागही दुर्लक्ष करीत असल्याने अनियंत्रीत वाहतुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. याच अनियंत्रीत वाहतुकीमुळे आलापल्ली-भामरागड मार्गावर कोडसेपल्ली गावाजवळ बुधवारी ११ वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर १७ जण जखमी झाले आहेत. यामध्ये नऊ गंभीर आहेत.
कुमा बंडू लेकामी (५०), झुरी दस्सा गावडे (६५) व चुक्कू करपा आत्राम (६५) तिघेही रा. कोडसेपल्ली, प्रवाशी वाहनाचा चालक विनोद राजन्ना सुरमवार (२८) रा. दामरंचा अशी मृतकांची नावे आहेत. गंभीर जखमींमध्ये पोच्चा जोगी तलांडे (४५) रा. पालेकसा, येल्लुबाई पोचम गड्डमवार (५०) रा. अहेरी, जोन्ना चेतू आत्राम (३०) रा. एकरा, बाबाजी वारलु गोंगले (६२), चैतू चिन्ना तलांडे (४५), चिन्ना इरपा तलांडे (४५), खोई केशव आत्राम (५५), मासा पेंकू तलांडी (६५), कोटके गुंडा आत्राम (३०) सर्व रा. कोडसेपल्ली यांचा समावेश आहे. यातील काही जखमींना गडचिरोली तर काहींना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
इरपा मटला आत्राम (३०) रा. पालेकसा, कोत्ता बक्का आत्राम (४०) रा. पालेकसा, भास्कर आश्चन्ना राऊत (६०) रा. अहेरी, बोढा तोढा तलांडी (५०) रा. कोडसेपल्ली, हनमंतू नामय्या कोंडीवार (६०), अंजू ताजखान पठाण (२५), व्यंकम्मा रामलू रूद्रपल्लीवार (६०), पद्मा जंगलसिंग मडावी (२९) सर्व रा. आलापल्ली हे किरकोळ जखमी आहेत. त्यांच्यावर अहेरी येथील आलापल्ली रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पेरमिली, येरमनार, कोडसेपल्ली, मांड्रा, दामरंच्चा या मार्गावर एसटी बसची सोय नसल्याने नागरिकांना खासगी वाहनाने आलापल्ली येथे जावे लागते. बुधवारी भामरागड येथे आठवडी बाजार असल्याने भाजीपाला घेऊन ट्रक भामरागडकडे जात होता. दोन्ही वाहने भरधाव वेगात होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसली. या परिसरातील अनियंत्रीत व अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही. नऊ प्रवाशी बसू शकणाऱ्या वाहनात तब्बल २५ पेक्षा अधिक प्रवाशी बसविले जातात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. पैशाच्या लालसेने वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी भरतात. तर दुसरे वाहन मिळत नसल्याने वाहनात बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसतानाही प्रवाशी वाहनात बसतात. ३ एप्रिल रोजी तलवाडा गावाजवळ दुचाकी व मालवाहू पीकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दिवसेंदिवस अपघात वाढले आहेत. यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
सामाजिक संघटनांकडून मदतीचा हात
अपघात झाल्याची माहिती कळताच हेल्पिंग हॅन्ड सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रतिक मुधोळकर, दीपक सुनतकर, असाद सय्यद, विकास तोडसाम, किशोर अग्गुवार, योगेश सडमेक यांनी रूग्णांना उपचाराकरिता मदत केली.
नायब तहसीलदार दिनकर खोत, सभापती सुरेखा आलाम, जि.प. सदस्य अजय नैताम, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, दिवाकर आलाम, विनोद रामटेके, प्रशांत गोडसेलवार यांनी रूग्णालयात जाऊन रूग्णांची पाहणी केली.
रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ. हकीम, डॉ. अनंत जाधव, डॉ. अश्लेषा गाडगीळ, डॉ. चेतन इंगोले यांच्यासह रूग्णालयातील कर्मचारी एस. मोटगू, एस. रायपुरे, प्रेरणा झाडे, वनिता मडावी, करिश्मा चिडे, एस. करमे, फ्लारेन्स नेहमिया, मेहमूहाबी पठाण, पद्मा सारवत, विनीत खोके, निखील कोंडापर्ती, मधू मंचर्लावार यांनी उपचार केले.