अनुभवहीन नेतृत्वाने घेतला उमेशचा जीव
By Admin | Updated: June 29, 2014 23:53 IST2014-06-29T23:53:46+5:302014-06-29T23:53:46+5:30
ग्यारापत्ती परिसरातील कटेझरी जंगलात पोलीस जवान उमेश जावळे शहीद झाला. मात्र त्याच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्यात नक्षलविरोधी विशेष प्रशिक्षण प्राप्त पोलीस पथके

अनुभवहीन नेतृत्वाने घेतला उमेशचा जीव
गडचिरोली : ग्यारापत्ती परिसरातील कटेझरी जंगलात पोलीस जवान उमेश जावळे शहीद झाला. मात्र त्याच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्यात नक्षलविरोधी विशेष प्रशिक्षण प्राप्त पोलीस पथके असतांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शीघ्रकृती दलाचे जवान नक्षल्यांशी जिकरीचा लढा देतात. अधिकाऱ्यांच्या अतिआत्मविश्वामुळे शिपायांना प्राणांची आहुती द्यावी लागत आहे़ या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
देसाईगंज येथील शिघ्रकृती दलाचे पोलीस जवान मागील १२ दिवसांपासून नक्षल विरोधी मोहीम राबवित होते़ मागील तीन ते चार वर्षांपासून देसाईगंज उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शिघ्रकृती दल कार्यरत आहे. जंगलात नक्षल विरोधी मोहीम राबविणे हेच या दलाचे काम आहे, असे अधिकारी सांगतात़ जिल्ह्यात विशेष नक्षल विरोधी पथक असताना देखील येथील शिघ्रकृती दलाच्या जवानांना कोणतेही विशेष प्रशिक्षण देण्यात आले नाही. मात्र त्यांना सर्रास नक्षल विरोधी शोध मोहिमेवर पाठविले जात आहे. गृह विभागाच्या कायद्यानुसार सदर जवान मोहिमेवर पाठविता येत असले तरी त्यांच्यासोबत अनुभवी अधिकारी असणे आवश्यक आहे़ मात्र देसाईगंज शिघ्रकृती दलाकडे अनुभवशून्य अधिकारी कार्यरत आहेत़ या कृती दलामार्फत मोहिमेवर जातांना कुठल्याही प्रकारच्या डावपेचांची आखणीदेखील केली जात नाही़ डावपेचांची आखणी करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची गरज आहे. प्रत्यक्ष गोळीबारात सहभागी झालेले अधिकारी या दलाकडे कार्यरत नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे. कटेझरी जंगलात झालेल्या चकमकीत अनुभवी अधिकारी असते तर उमेश जावळे हा पोलीस जवान बचावला असता. केवळ वरिष्ठांची सूचना मिळाली की, जंगलात हत्यारासह शोध मोहीम राबविणे हाच देसाईगंज शिघ्रकृती दलाचा उपक्रम सुरू आहे़ नक्षल्यांच्या बीमोडाचा भार असलेल्या प्रत्येक नक्षल विरोधी पथकाकडे अनुभवी अधिकारी आवश्यक असल्याचा पोलीस विभागाचा फतवा आहे़ मोहिमेवर जाताना प्रत्येक डावपेचांची माहिती दलातील जवानाला असणे आवश्यक आहे़ अनुभवशून्य अधिकाऱ्यांचा अतिआत्मविश्वास उमेश सारख्या जवानाला नडला़ (वार्ताहर)