ठळक मुद्देएक पुरुष आणि एका महिलेचा समावेश छत्तीसगड सीमेकडील मोरचुलच्या जंगलातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पोलिसांच्या सी-60 पथकात आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी सकाळी उडालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. त्यात एक पुरुष आणि एक महिला नक्षलवादी आहे. अजूनही त्या परिसरात शोधमोहीम सुरूच आहे.
धानोरा तालुक्यातील मुरूमगाव या छत्तीसगड सीमेकडील गावाजवळ असलेल्या मोरचुलच्या जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सकाळी 7 वाजता सी-60 पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार करताच पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात दोन नक्षल्यांचा खात्मा झाला. अजूनही शोध सुरूच आहे. मृत नक्षलींची ओळख अद्याप पटली नाही.