दोन महिन्यांचा पाऊस चार दिवसात
By Admin | Updated: July 23, 2014 23:37 IST2014-07-23T23:37:27+5:302014-07-23T23:37:27+5:30
१९ ते २३ जुलै या चार दिवसात जिल्ह्यात संततधार पाऊस पडला असून या चार दिवसात सुमारे २२८ मीमी एवढा पाऊस पडला आहे. हे प्रमाण यावर्षीच्या पावसाळ्यात आजपर्यंत पडलेल्या पावसाच्या सुमारे निम्मे आहे.

दोन महिन्यांचा पाऊस चार दिवसात
गडचिरोली : १९ ते २३ जुलै या चार दिवसात जिल्ह्यात संततधार पाऊस पडला असून या चार दिवसात सुमारे २२८ मीमी एवढा पाऊस पडला आहे. हे प्रमाण यावर्षीच्या पावसाळ्यात आजपर्यंत पडलेल्या पावसाच्या सुमारे निम्मे आहे. त्यामुळे शेतकरी थोडाफार आनंदी झाला असला तरी फसल निघण्यासाठी आणखी पावसाची गरज भासणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे मोठ्याप्रमाणात उत्पादन घेतले जाते. या पिकासाठी सिंचनाची मोठ्याप्रमाणात गरज भासते. धानपिकाला अगदी सुरूवातीपासून तर शेवटपर्यंत जलसिंचनाची गरज भासते. मागील वर्षी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातही पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच पावसाने हजेरी लावली होती. मागील वर्षी २३ जुलैपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी १ हजार ३८ मीमी एवढा पाऊस पडला होता. यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांनाही चांगलाच त्रास दिला. १७ जुन रोजी पहिला पाऊस पडल्यानंतर पावसाने कायमची दडी मारली होती. १९ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ सरासरी २४९ मीमी एवढा पाऊस पडला. त्यानंतर १९ जुलैपासून दमदार पावसाने झोडपून काढले. या चार दिवसात सुमारे २२८ मीमी पाऊस पडला आहे. पावसाळ्यापासून २३ जुलैपर्यंत सरासरी ४७७.८४ मीमी एवढा पाऊस पडला आहे. पावसाळ्याला सुरूवात होऊन २ महिन्यात जेवढा पाऊस पडला जवळपास तेवढा पाऊस चार दिवसात पडला आहे. चार दिवसाच्या पावसाने नदी,नाले ओसंडून वाहत आहेत. तर तलावांमध्ये पाणी साचले आहे. बरेचसे तलाव या चार दिवसाच्या पावसाने निम्मी भरली आहेत. चार दिवसाच्या संततधार पावसानंतर २३ जुलै रोजी पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे चार दिवस विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर यायला लागले आहे. (नगर प्रतिनिधी)