६ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2022 13:18 IST2022-09-21T13:03:31+5:302022-09-21T13:18:11+5:30
यामुळे नक्षल चळवळीला माेठा धक्का बसला आहे.

६ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण
गडचिरोली : नक्षल चळवळीला कंटाळून दाेन जहाल नक्षलवाद्यांनी गडचिराेली पाेलिसांसमाेर आत्मसमर्पण केले. यामुळे नक्षल चळवळीला माेठा धक्का बसला आहे. या दाेघांवरही ६ लाख रुपयांचे बक्षीस हाेते.
अनिल उर्फ रामसाय जगदेव कुजूर (२६ वर्ष) याच्यावर ४ लाखांचे तर रोशनी उर्फ ईरपे नरंगो पल्लो (३० वर्ष) असे पोलिसांना शरण आलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता या दोघांनाही केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत नक्षलवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून अनेक जहाल नक्षलवादी आत्मसमर्पणाच्या वाटेवर आले आहेत. तसेच, पोलीस दलाने आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुनर्वसन घडवून आणल्यामुळे मोठ्या संख्येने नक्षलवादी आत्मसमर्पण करीत आहेत. यातच ६ लाख रुपये बक्षीस असलेल्या २ दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच नक्षलवद्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.