गोंडी भाषेत हवे शिक्षण, आदिवासींचा न्यायालयात लढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:27 IST2025-03-25T11:25:24+5:302025-03-25T11:27:05+5:30
Gadchiroli : ग्रामसभा शिक्षण समितीकडे कारभार

Tribals fight in court for education in Gondi language
गोपाल लाजूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्रातील आदिवासी मुलांना गोंडी, कोरकू, भिल्ली अशा त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे, हा झाला सुविचार. वास्तव मात्र तसे नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यात मोहगाव येथे २०१९ मध्ये पंधरा गावांच्या ग्रामसभेने सुरू केलेल्या गोंडी माध्यमाच्या निवासी शाळेची परवड पाहता सरकारचे याविषयीचे नेमके धोरण काय असा प्रश्न पडावा.
पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल' असे या शाळेचे नाव आहे. गोंडी भाषेत कोया म्हणजे गोंडी धर्म. या शाळेला शासकीय मान्यता मिळाली नाही. उलट ती नियमबाह्य ठरवून मध्यंतरी शिक्षण विभागाने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. आता गावकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. नर्सरीपासून पाचवीपर्यंत विद्यार्थी संख्या ६५ वर पोहोचली आहे. शाळा लोकसहभागातून चालविली जाते.
प्रस्ताव आदिवासी विभागाकडे
मोहगाव येथील गोंडी माध्यम निवासी शाळेला मान्यता मिळावी यासाठी सुरुवातीला शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता; परंतु ही शाळा निवासी व गोंडी माध्यमाची असल्याने आदिवासी विकास विभागाकडे शाळेच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. अजून प्रस्ताव मंजूर झालेला नाही.
ग्रामसभा शिक्षण समितीकडे कारभार
ग्रामसभेद्वारा गावात शिक्षण समिती गठित करण्यात आली. ही समिती शाळेचा कारभार पाहते. ग्रामसभेने शिक्षक नियुक्त केलेले आहेत. गावातील शेतकरी गटाची इमारत शाळेसाठी निःशुल्क दिली आहे.