वृक्ष लागवडीला विलंब
By Admin | Updated: July 27, 2014 00:05 IST2014-07-27T00:05:44+5:302014-07-27T00:05:44+5:30
शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला यंदा ८३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. यासाठी कृषी, वन विभाग, सामाजिक वनीकरण यासह अन्य विभागाने तयारी केली आहे.

वृक्ष लागवडीला विलंब
शतकोटी योजना : जिल्ह्याचे उद्दिष्ट राहणार अपूर्ण
दिलीप दहेलकर - गडचिरोली
शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला यंदा ८३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. यासाठी कृषी, वन विभाग, सामाजिक वनीकरण यासह अन्य विभागाने तयारी केली आहे. मात्र यंदा जिल्ह्यात पावसाने उशिरा हजेरी लावली. पाच-सहा दिवसापूर्वी जिल्ह्यात संततधार पाऊस बरसला. अनेक विभागाने खड्डे खोदण्याची कारवाई सुरू केली आहे. मात्र पावसाला उशीर झाल्याने वृक्ष लागवडीला विलंब होत आहे. यामुळे यंदा जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट अपूर्ण राहण्याचे चिन्ह आहे.
वातावरणातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षाची आवश्यकता आहे. आधुनिक विभाग ग्लोबल वार्मिंगमुळे तर निसर्गंच बदलत आहे. या पार्श्वभूमीवर शतकोटी वृक्ष लागवड योजना महत्वाची आहे. यासाठी शासननाचे विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था यांच्यात मार्फतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शतकोटी वृक्ष लागवड योजना अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. राज्य शासनाच्या २० कलमी कार्यक्रमांतर्गत गेल्या चार-पाच वर्षांपासून जिल्ह्यात वनविभाग, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद व इतर विभागांना दरवर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिल्या जाते. यासाठी राज्य शासनाचा लाखो रूपयाचा खर्च होतो.
यंदा गडचिरोली जिल्ह्याला या योजनेंतर्गत ८३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यापैकी एकट्या वनलविभागाला ६० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्या खालोखाल सामाजिक वनीकरण, एफडीसी, कृषी विभाग, बांधकाम, पाटबंधारे व इतर विभागांना वृक्ष लागवड करावयाची आहे. वृक्ष लागवडीसाठी या सर्व विभागाने खड्डे खोदण्याच्या कारवाईला सुरूवात केली आहे. वनविभागाला वृक्ष लागवडीसाठी १५ लाख ३ हजार ३०, सामाजिक वनीकरणाला ३७ हजार, आरडीडी व जिल्हा परिषदेला मिळून ४ लाख ६९ हजार ६८५ तसेच इतर विभागाला ४ हजार खड्डे खोदण्याचे उद्दीष्ट आहे.
यापैकी वन विभागाचे सद्यस्थितीत १३ लाख ११ हजार ४३० तर इतर विभागाचे ३ हजार ४७९ आरडीडी व जिल्हा परिषद मिळून २ लाख ७९ हजार २५७ आणि सामाजिक वनीकरण विभागाचे २२ हजार ५१६ खड्डे खोदून झाले आहेत. जिल्ह्यात पाऊस उशीरा बरसल्यामुळे या विभागांना खड्डे खोदण्यासाठी विलंब झाला. चार-पाच दिवसानंतर जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळला. चार-पाच दिवस पाऊस सुरूच असल्याने या कालावधीत या विभागांना खड्डे खोदण्याचे काम करता आले नाही. त्यामुळे या सर्व विभागाने आता खड्डे खोदण्याच्या कामाला वेग दिला आहे.
मात्र खड्डे खोदण्याचे कामही विलंबाने होत आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठणे कठीण आहे. वन विभागासह अन्य विभागाचे बरेच खड्डे खोदणे शिल्लक असल्याची माहिती आहे. सध्या जिल्ह्यात रोवणीचा हंगाम जोमात सुरू आहे. त्यामुळे खड्डे खोदण्यासाठी या विभागांना पुरेसे मजूर मिळत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या सर्व विभागाने दोन महिन्यापूर्वीच वृक्ष लागवडीचे नियोजन केले मात्र पावसाच्या लपंडावामुळे नियोजन अयशस्वी झाले आहे.