गडचिरोली: आरमोरीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोघे भाऊ जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरापासून एक किमी अंतरावर आरमोरी मार्गावरील प्लाटिनम ज्युबिली शाळेजवळ घडला.
पुरुषोत्तम बाबूराव बारसागडे (वय, ३८), अंकुश बाबुराव बारसागडे (वय, ३२) रा. विसापूर रोड, गडचिरोली असे मृतकांची नावे आहेत. धान्य पिकाला रोग लागल्याने कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी पुरषोत्तम व अंकुश दोघेही भाऊ एकाच दुचाकीने कठाणी मार्गावर असलेल्या शेतात गेले. फवारणीचे काम आटोपून ते दुचाकीने घराकडे परत येत होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती कळताच गडचिरोली पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत दोघांचाही जीव गेला. गडचिराेली शहरापासून अपघात एक किमी अंतरावर सदर अपघात घडला. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. ट्रक चालक महेश माणीक पुरी (वय, ३२) रा. चंद्रपूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
असा घडला अपघात
एमएच ३४ बीजी ८६५७ क्रमांकाच्या ट्रक गडचिरोलीवरून आरमोरीकडे जात होता. तर, एमएच ३३ आर ७७८९ क्रमांकाच्या दुचाकीने पुरुषोत्तम व अंकुश हे दाेघेही भाऊ परत येत होते. प्लाटिनम ज्युबिली शाळेजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात पुरुषोत्तम व अंकुश हे दोघेही जागीच ठार झाले. नियंत्रणाबाहेर गेलेला ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला गेला.
डाबंरी रस्त्यापर्यंत वाढली झुडपे
गडचिरोली-आरमोरी हा राष्ट्रीय महामार्ग घोषित केला आहे. मात्र या मार्ग नावालाच राष्ट्रीय महामार्ग आहे. ज्या ठिकाणी सदर अपघात घडला. त्या ठिकाणी मोठा खड्डा आहे. सदर खड्डा वाचिवण्याच्या प्रयत्नातच अपघात घडला असावा, अशी शक्यता आहे. डांबरी रस्त्यापासून जवळपास पाच फुट कच्चा मार्ग व्यवस्थित असणे आवश्यक आहे. मात्र या कच्च्या रस्त्यावर झुडपे, गवत उगवले आहेत. झुडपांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. परिणामी रस्त्याच्या बाजूला वाहन गेल्यास हमखास अपघात होतो.
बारसागडे कुटुंब झाले पोरके
पुरुषोत्तम व अंकुश या दोघांचेही कुटुंब एकत्र राहत होते. शेतीकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, दोघेही भाऊ मरण पावल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. बारसागडे कुटुंबच पोरके झाले आहे. पुरुषोत्तमला पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व अंकुशला एक मुलगा आहे. दोघांच्याही पार्थिवावर बुधवारी बोरमाळा नदीघाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Web Summary : A speeding truck collided with a motorcycle near Gadchiroli, killing two brothers instantly. The accident occurred on Armori road when they were returning from their farm. Police have arrested the truck driver.
Web Summary : गडचिरोली के पास एक तेज रफ्तार ट्रक ने मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे दो भाइयों की मौके पर ही मौत हो गई। दुर्घटना आरमोरी मार्ग पर हुई जब वे अपने खेत से लौट रहे थे। पुलिस ने ट्रक ड्राइवर को गिरफ्तार कर लिया है।