झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:45 IST2019-07-07T23:44:53+5:302019-07-07T23:45:16+5:30
कमलापूर-छल्लेवाडा मार्गावरील चिंतलगुडम गावात ५ जुलै रोजी झाड कोसळल्याने मागील तीन दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. मागील आठ दिवसांपासून कमलापूर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे.

झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : कमलापूर-छल्लेवाडा मार्गावरील चिंतलगुडम गावात ५ जुलै रोजी झाड कोसळल्याने मागील तीन दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे.
मागील आठ दिवसांपासून कमलापूर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. कमलापूरपासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या चिंतलगुडम येथील रस्त्याच्या बाजुला असलेले फार जुने चिंचेचे झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प आहे. कोडसेलगुडम, छल्लेवाडा, ताटीगुडम या गावांसाठी मानव विकास मिशनची बस चालविली जाते. मात्र रस्त्यावर झाड पडले असल्याने मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली आहे. तीन दिवस उलटूनही झाड उचलण्यात आले नाही. विद्यार्थ्यांना पायीच शाळेत यावे लागत आहे. चिंचेचे झाड अतिशय मोठे आहे. आता शेतीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिक झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायतीने रस्ता मोकळा करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. कमलापूर परिसरातील गावे जंगलाने वेढली आहेत. त्यामुळे सरपणाची आवश्यक नाही. नागरिकही झाडाच्या फांद्या तोडण्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.