दीड महिन्यांच्या संचारबंदीने व्यापारी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST2021-05-27T04:38:20+5:302021-05-27T04:38:20+5:30
सिरोंचा : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला कोरोना संसर्गाचा जबरदस्त फटका बसला आहे. ...

दीड महिन्यांच्या संचारबंदीने व्यापारी त्रस्त
सिरोंचा : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला कोरोना संसर्गाचा जबरदस्त फटका बसला आहे. सिरोंचा तालुकास्थळ व तालुक्यातील अनेक गावेही कोरोना संसर्गाने प्रभावित झाली. २०२० च्या पहिल्या लाटेपेक्षा २०२१ ची दुसरी लाट संसर्गाचे विविध स्टेरन घेऊन आली. संचारबंदीचा तिसरा टप्पा सुरू असून ३१ मे २०२१ पर्यंत राहणार आहे. सततच्या संचारबंदीतून व्यापारीवर्गाचे व्यवसाय रुळांवर, पूर्वपदांवर येण्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा यावर्षीच्या कोरोनाने व्यापार पूर्ण ठप्प करून टाकला. दीड महिन्यांच्या संचारबंदीने व्यापारी त्रस्त झाले आहेत.
नेहमीच्या संचारबंदीमुळे लहान व मध्यम दुकानदारांचे कंबरडे मोडले आहे. यात श्रीमंत मोठे दुकानदार जे होलसेल व किरकोळ (ठोक व चिल्लर) विक्री करतात, अशा व्यापा-यांना काही फरक पडत नाही. पण, गरीब व मध्यम दुकानदारांचे हाल सुरू आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीप्रमाणे मध्यमवर्गीय कुटुंबे मूठ झाकून गाडा चालवित आहे. उन्हाळा म्हणजे सर्वच व्यावसायिकांना सुगीचे दिवस असतात. उन्हाळ्यात परराज्यांतील काही व्यावसायिक येऊन चारचाकी हातगाडीवर दिवसभर फिरून शीतपेय विकत असत. परंतु, भर उन्हाळ्यात संचारबंदी व संसर्गाच्या भीतीने त्यांचे व्यवहार पूर्णतः बंद झाले. काहींनी व्यवसाय बदलवून भाजीपाला व फळेविक्रीचे कार्य सुरू केले. संचारबंदीचा पहिला टप्पा १४ एप्रिल २०२१ रात्री ८ वाजेपासून ३० एप्रिल पर्यंत १५ दिवस आणि दुसरा टप्पा १ मे ते १५ मे २०२१ पर्यंत १५ दिवस, तिसरा टप्पा १६ मे ते ३१ मे २०२१ पर्यंत सुरू आहे. याशिवाय, वीकेंड लाॅकडाऊन म्हणून शनिवार व रविवार दोन दिवस पूर्ण बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे.
या दीड महिन्यांच्या संचारबंदीने सर्वच व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. व्यवसाय बंद असला तरी दररोजचा कुटुंबाचा खर्च, दुकानाचे भाडे, विद्युतबिले, या सर्वांचा भार सहन करावा लागतो. यावेळच्या लाॅकडाऊनमध्ये शासनाच्या निर्बंधांचे योग्य रीतीने पालन होताना दिसत नाही. फक्त किराणा व भाजीपाला विक्रेत्यांनाच सकाळी ७ ते ११ पर्यंत विक्रीसाठी परवानगी दिली आहे. परंतु, याव्यतिरिक्त काही निर्बंध असलेली दुकानेही या वेळेत उघडून व्यापारी बसलेले असतात. पण, काही दुकानदार नियमांचे पालन करीत पूर्णपणे बंद ठेवून आहेत. घर आणि दुकान एकाच ठिकाणी असलेले दुकानदार दिवसभर विक्री करत असल्याचे दिसून येते. संचारबंदीत बांधकामांना निर्बंध असले तरी बांधकामे नेहमीप्रमाणे सुरू आहेत. रेतीचा कुठेच तुटवडा नसल्याचे दिसते. एकंदरीत, या संचारबंदीचा फटका सर्वसामान्य व्यापारीवर्गाला बसत आहे.