जिल्हाभरात आज भीम जयंती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:41 IST2018-04-14T01:41:00+5:302018-04-14T01:41:00+5:30
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार १४ एप्रिलला जिल्हाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

जिल्हाभरात आज भीम जयंती कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार १४ एप्रिलला जिल्हाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
कॉम्प्लेक्स येथील डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर चौकात १४ एप्रिल रोजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ९.३० वाजता कॉम्प्लेक्समध्ये डॉ. आंबेडकर चौकात ध्वजारोहण व बुध्दवंदना होईल. कार्यक्रमाला नगराध्यक्ष योगीता पिपरे, सलीम बुधवानी, नगरपरिषदेचे वित्त व नियोजन सभापती संजय मेश्राम, नगरसेविका रंजना गेडाम, वर्षा बट्टे, अखिल भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष सी. पी. शेंडे उपस्थित राहतील. सायंकाळी भीम-बुध्द गीतांचा कार्यक्रम व सामूहिक भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता होईल.
कारमेल हायस्कूलच्या मागे साईनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम १४ एप्रिलला आयोजित करण्यात आला. सकाळी ८ वाजता बुद्ध वंदना, १० वाजता प्रबोधन कार्यक्रम, दुपारी २ वाजता विविध स्पर्धा पार पडतील. कार्यक्रमाला प्रा. गौतम डांगे, अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, मुरूमगावचे डॉ. वीरेंद्र भावे उपस्थित राहतील, अशी माहिती उत्सव समितीने दिली आहे.
धानोरा येथे सामाजिक बौद्ध समाज विकास बहुउद्देशिय संस्था, तालुका पत्रकार संघाच्या वतीने वनपरिक्षेत्र कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन १४ एप्रिलला सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. रक्तदात्यांपैकी ईश्वरचिठ्ठीने तीन रक्तदात्यांची निवड करून त्यांना अनुक्रमे १००१, ७०१ व ५०१ रूपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी माहिती आरएफओ नितीन हेमके यांच्यासह आयोजकांनी दिली आहे.
घोट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीत व समाजप्रबोधन कार्यक्रम होणार आहे. उद्घाटन जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी आरएफओ शेखर तनपुरे राहतील. यावेळी सरपंच विनय बारसागडे, पं.स. सदस्य सुरेश कामेलवार, उपसरपंच साईनाथ नेवारे, पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकारी राजपूत उपस्थित राहतील. रात्री ८.३० वाजता समाजप्रबोधन कार्यक्रम होईल.