साडेचार लाखांची मजुरी थकीत

By Admin | Updated: February 20, 2016 02:07 IST2016-02-20T02:07:34+5:302016-02-20T02:07:34+5:30

धानोरा तालुक्यातील धानोरा दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत फासी टोला येथील वन विभागाच्या कक्ष क्र. ४५५ वरील ४५ हेक्टर जमिनीवरील...

Tired of four and a half million wages | साडेचार लाखांची मजुरी थकीत

साडेचार लाखांची मजुरी थकीत

सात महिने उलटले : मिश्र व बांबू रोपवन लागवडीचे काम
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील धानोरा दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत फासी टोला येथील वन विभागाच्या कक्ष क्र. ४५५ वरील ४५ हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण काढून त्या ठिकाणी संयुक्त वनव्यवस्थापन समिती ग्रामस्थांच्या वतीने बांबू व मिश्र रोपवनाची लागवड करण्यात आली. मात्र या कामाला सात महिन्यांचा कालावधी उलटूनही मजुरांना या कामाची मजुरी मिळाली नाही. तब्बल दीडशे मजुरांची साडेचार लाख रूपयांची मजुरी थकीत असल्याने मजूर प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहे.
वन विभागाच्या कक्ष क्रमांक ४५५ मधील ४५ हेक्टर जागेवर काही नागरिकांनी पाच वर्षांपासून अतिक्रमण केले होते. ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन या जागेवरील अतिक्रमण हटविले. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या जागेवर बांबू व मिश्र रोपवनाची लागवड करण्यात आली. त्यानंतर निंदणाचे कामही करण्यात आले. मजुरी मिळण्यासाठी वन विभागाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. ३० नोव्हेंबर २०१५ रोजी या विषयावर ग्रामसभा बोलाविण्यात आली. रोपवन कामाची मजुरी न मिळाल्याने या रोपवनाच्या पुढील कामात येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. ४५ हेक्टर आर वन जमिनीवर क्षेत्र सहाय्यक जे. आर. गेडाम, ए. एस. गेडाम यांच्या पुढाकारातून बांबू व मिश्र रोपवन तयार करण्यात आले. या रोपवनात बांबू व मिश्र प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. याशिवाय फासीटोला येथील ग्रामस्थांनी स्वत: पुढाकार घेऊन रोपवनाचे काम केले. मात्र रोपवनाच्या कामाची मजुरी मजुरांना न मिळाल्याने फासीटोला संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांसह ग्रामस्थांचा उत्साह कमी होत आहे. शिवाय मजुरी थकीत असल्यामुळे या जागेवर अतिक्रमण होण्याची भीती आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून मजुरीची रक्कम तत्काळ अदा करण्यात यावी, असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.
यानंतर फासीटोला येथील यशवंत कुमोटी, रामदास कोरेटी, मंगुराम हलामी, चिन्नू साधू कुमोटी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांची जानेवारी महिन्यात भेट घेऊन थकीत मजुरीची रक्कम अदा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी चर्चा करून सदर रक्कम अदा करण्याचे निर्देश वन विभागाला दिले. मात्र वन विभागाकडून अद्यापही रोपवन लागवडीचे काम करणाऱ्या मजुरांना मजुरी मिळाली नाही. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Tired of four and a half million wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.