अंगात कणकण अन् हलकीशी चक्कर; तुम्हाला ॲनिमिया तर नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:02 IST2025-03-27T17:52:55+5:302025-03-27T18:02:25+5:30
तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार हवा : रुग्णांच्या पोषण आहाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता

Tingling in the body and slight dizziness; Are you suffering from anemia?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रक्तातील लाल रक्तपेशी कमी होण्यास कारणीभूत असलेल्या कोणत्याही कारणाला ॲनिमिया म्हणतात. काही कारणे अल्पकालीन किंवा तात्पुरती असू शकतात, तर काही दीर्घकालीन समस्या असू शकतात.
अशक्तपणा ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये लाल रक्तपेशींची संख्या किंवा हिमोग्लोबिन सामान्यापेक्षा कमी असते. पुरुष आणि महिलांमध्ये हिमोग्लोबिनची सामान्य पातळी सामान्यतः वेगळी असते. दरम्यान बारीक ताप, हलकीशी चक्कर येणे अशी लक्षणे जाणवतात.
लोखंडी कढईचा वापर करा; पालेभाज्या खा
ॲनिमिया असलेल्या रुग्णांनी आपल्या आहाराकडे पूर्ण लक्ष दिले पाहीजे. विविध जीवनसत्वे व पोषण मिळण्यासाठी पालेभाज्या खाणे आवश्यक आहे.
महिलांमध्ये 'ॲनिमिया'चे प्रमाण चिंताजनक
मासिक पाळीत रक्त कमी होणे, लोह कमतरता, अयोग्य आहार, गर्भधारणा व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आदींमुळे महिलांमध्ये ॲनिमिया'चे प्रमाण वाढत आहे.
रुग्णाला थकवा, चक्कर अन् केस गळतीचा त्रास
रक्तक्षयामुळे प्रकृतीमध्ये बराच बिघाड निर्माण होतो. महिलांमध्ये थकवा, चक्कर आणि केस गळतीचा त्रास होतो. यावर औषधोपचार गरजेचे आहे.
पुरेशी झोप, मॉर्निंग वॉक महत्त्वाचा
शरीरातील थकवा व झिज भरून निघण्यासाठी नागरिकांनी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. हलकाफुलका व्यायाम सोबतच मॉर्निंग वॉक महत्त्वाचा आहे. शिवाय योगासनेही उपयुक्त ठरतात.
उन्हाळ्यात ॲनिमियाचा त्रास वाढतो का ?
- शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
- अनेकवेळा शरीरात अशक्तपणाचा त्रास होत असतो, तेव्हा आहारात बदल केल्याने समस्या सुटू शकते.
- उन्हाळ्यात शरीरातील पाणी पातळी ॲनिमियाचा त्रास वाढत असतो.
पोषणतत्त्वांची कमतरता हे मुख्य कारण
ॲनिमिया अर्थात रक्तक्षय हे पोषणतत्त्वांची कमतरतेमुळे होते. दरम्यान अशावेळी तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावे लागतात. शिवाय आहाराकडे पूर्ण लक्ष देणे गरजेचे ठरते.
'ॲनिमिया'चे किती प्रकार ?
- अप्लास्टिक ॲनिमिया - जेव्हा तुमचे शरीर पुरेसे लाल रक्तपेशी तयार करत नाही तेव्हा होतो.
- सिकलसेल ॲनिमिया - हा एक अनुवांशिक आजार आहे आणि तो वारशाने मिळतो. लाल रक्तपेशी त्यांची रचना आणि ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता गमावतात.
- थॅलेसेमिया - रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यामुळे वारशाने मिळालेला अनुवांशिक आजार म्हणून होतो.
"ॲनिमियाचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे. जीवनसत्वांचा अभाव, पोषण आहाराचा अभाव आदींमुळे ॲनिमियाचा त्रास होतो. तातडीने तपासणी करून नियमित औषधोपचार करणे गरजेचे आहे."
- डॉ. प्रशांत आखाडे, स्त्रीरोग तज्ज्ञ, महिला रुग्णालय, गडचिरोली.