घनदाट जंगलात जवानांचं थरारक ऑपरेशन; येत्या मार्चपूर्वी गडचिरोली होणार नक्षलमुक्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 10:01 IST2026-02-08T10:01:33+5:302026-02-08T10:01:33+5:30
त्या ७ माओवाद्यांवर होते ७१ लाखांचे बक्षीस, भामरागडच्या फोदेवाडा जंगलात ३ फेब्रुवारीपासून सी-६० पथकाच्या १४ तुकड्यांमार्फत माओवादविरोधी अभियान सुरू झाले

घनदाट जंगलात जवानांचं थरारक ऑपरेशन; येत्या मार्चपूर्वी गडचिरोली होणार नक्षलमुक्त!
गडचिरोली - अबुझमाडच्या घनदाट जंगलात जवान व माओवाद्यांतील चकमकीच्या थरारनाट्याचा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत उलगडा केला. सलग तीन दिवस व तीन रात्री घनदाट जंगलात जिवाची पर्वा न करता जवानांनी शौर्य दाखवीत माओवाद्यांवर मात केली. सातही मृत माओवाद्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर सुमारे ७१ लाखांचे इनाम होते.
भामरागडच्या फोदेवाडा जंगलात ३ फेब्रुवारीपासून सी-६० पथकाच्या १४ तुकड्यांमार्फत माओवादविरोधी अभियान सुरू झाले. ४ रोजी माओवाद्यांनी गोळीबार केला, त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत दोन तळ उद्ध्वस्त केले. ५ व ६ रोजी अधूनमधून धुमश्चक्री सुरूच होती. घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा व माओवादी साहित्यदेखील आढळून आले. जवानांनी तब्बल पाच हजार, तर माओवाद्यांनीही आठशे गोळ्या झाडल्या. येत्या मार्चपूर्वी गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होईल, असा विश्वास नीलोत्पल यांनी व्यक्त केला.
९९ माओवाद्यांचा खात्मा
दरम्यान, २०२१ पासून आतापर्यंत तब्बल २९ माओवाद्यांना ठार करण्यात आले, तर १४० जणांना अटक केली. १५३ जणांनी आत्मसमर्पण केले. उर्वरित माओवाद्यांनी शस्त्रत्या करावे, असे आवाहन नीलोत्पल यांनी केले आहे.
ठार झालेले माओवादी असे
दंडकारण्य स्पेशल झोनल सदस्या, व कंपनी क्र. १० चा ब्यूरो प्रभाकर ऊर्फ लोकेती चंदरराव (५७, रा. इरसरोजीवाडा, जि. कामारेड्डी, तेलंगणा).
कंपनी क्र. ५ चा कमांडर पागु मोड्याम (३०, रा. डल्ला, ता. आवापल्ली जि. बिजापूर, छत्तीसगड), प्रभाकरची गार्ड अनिला उर्फ बुदरी कोवाची (२४, रा. सुकमा, छत्तीसगड), स्पेशल प्लाटून कमांडर कामेश पदा (३५, रा. दरबा, जि. सुकमा, छत्तीसगड), परालकोट दलमचा एसीएम भजनाथ उर्फ भीमा होळी (४०, रा. टेकालगुडेम, ता. कोंटा, जि. सुकमा, छत्तीसगड), कंपनी क्र. १० ची सदस्य मंगली कुरसाम (३०, रा. पश्चिम बस्तर, छत्तीसगड) आणि कंपनी क्र. ५ चा सदस्य जोगी सोढी- मडावी (२७, रा. बुडगीचेरू, जि. बिजापूर, छत्तीसगड)
शहीद मडावींना मदत...
वीरगती प्राप्त झालेले जवान दीपक मडावी यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २.२५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचीही घोषणा करण्यात आली.