उसेगाव परिसरात वाघाचे तीन बळी, ग्रामीण दहशतीत; उपाययोजना करण्याचे खासदारांचे निर्देष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 12:47 PM2022-05-05T12:47:53+5:302022-05-05T13:05:20+5:30

या वाघाचा बंदोबस्त करा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Three tiger victims in usegaon area, MP Ashok Nete instructions to catch the tiger | उसेगाव परिसरात वाघाचे तीन बळी, ग्रामीण दहशतीत; उपाययोजना करण्याचे खासदारांचे निर्देष

उसेगाव परिसरात वाघाचे तीन बळी, ग्रामीण दहशतीत; उपाययोजना करण्याचे खासदारांचे निर्देष

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना जंगलात जाणे अपरिहार्य

देसाईगंज (गडचिरोली) : तालुक्यातील उसेगाव परिसरात वावरणाऱ्या वाघाने गेल्यावर्षी एकाचा बळी घेतल्यानंतर यावर्षी अवघ्या १८ दिवसात दोन इसमांच्या नरडीचा घोट घेतला. त्यामुळे नागरिक चांगलेच दहशतीत आले आहेत. आता तेंदूपत्त्याचा हंगाम सुरू होत असल्याने पुढे हे संकट आणखी वाढणार आहे. त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

वन विभागाच्या विश्रामगृहात बुधवारी खासदार अशोक नेते यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली. याप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी कऱ्हांडे, दिलीप कौशिक, विजय धांडे यांच्यासह शिवराजपूर उसेगाव वन समितीचे अध्यक्ष प्रमोद झिलपे, सुनील पारधी, योगेश नाकतोडे, वसंत दोनाडकर व इतर ग्रामवासीय उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे यांनी मृत अजित नाकाडे यांच्या कुटुंबीयांना व खासदार नेते यांनी मृत मधुकर मेश्राम यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५००० रुपये आर्थिक मदत दिली.

सात वाघांचे अस्तित्व, काळजी घ्या

यावेळी उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले की, उसेगाव जंगल परिसरात १८ दिवसात हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. हा वाघ बाहेरून आलेला आहे. सद्यस्थितीत या परिसरात एकूण ७ वाघ अस्तित्वात आहेत. वन्यप्राण्यांचा वावर सतत वाढत असल्याने संबंधित ग्रामपंचायती, वनहक्क समित्यांच्या जंगल परिसरात नागरिकांनी जाऊ नये. काहीजण बेसावधपणे जात असल्याने अशा अप्रिय घटना घडत आहेत, असे त्यांनी सांगितले.

अन् त्याची मैत्रिण थोडक्याच बचावली

वाघाच्या हल्ल्यात या भागात १४ एप्रिलला कुरुडच्या मधुकर मेश्राम याचा जीव गेला. मंगळवारी चोप येथील २४ वर्षीय युवक अजित सोमा नाकाडे यालाही जीव गमवावा लागला. अजित आपल्या मैत्रिणीसोबत उसेगाव जंगल शिवारात गेला होता. यावेळी त्याच्या मैत्रिणीवरही वाघाने हल्ला केला होता, मात्र ती थोडक्यात बचावली.

वाघापासून बचावासाठी उपाययोजना

या बैठकीला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देताना खा. नेते म्हणाले, बऱ्याच शेतकऱ्याचे शेत, जंगल परिसरालगत असल्याने त्यांना पिकाचे पाणी देण्याकरता वेळोवेळी जावे लागते. लोडशेडिंगमुळे कृषी पंपाचा वीज पुरवठा रात्री ११ वाजता सुरू होतो. त्यामुळे त्यांना जीव मुठीत घेवून शेतात जावे लागते. तेंदुपत्ता संकलनावर बऱ्याच लोकांचे जीवनमान अवलंबून असल्याने मजुरांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

या वाघाने देसाईगंजलगत असलेल्या इंदोरा येथील एका व्यक्तीला मोहफुल संकलन करीत असताना ठार केले. हानी टाळण्यासाठी वनविभागाने त्याला तत्काळ जेरबंद करावे, रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेली झुडुपे नष्ट करावी. वन्यजिवांचा वावार असलेल्या परिसरातील हद्दीला सोलर कुंपण लावून रहदारीच्या मार्गावर वन्यजीव येणार नाही याची दक्षता घ्यावी. गावपातळीवरील वन समित्यांद्वारे चौकीदारांंची संख्या वाढवून जंगल परिसरात नागरिक जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

Web Title: Three tiger victims in usegaon area, MP Ashok Nete instructions to catch the tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.