श्री पद्धतीमुळे दीडपट उत्पन्न वाढ
By Admin | Updated: August 18, 2014 23:30 IST2014-08-18T23:30:16+5:302014-08-18T23:30:16+5:30
धानाची रोवणी करीत असतांना पारंपरिक पद्धतीपेक्षा नवीन पद्धतीचा वापर केल्यास अधिकाधिक उत्पन्न येऊ शकते, धानाचे पीक घेण्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये श्री पद्धती अत्यंत कमी खर्चाची

श्री पद्धतीमुळे दीडपट उत्पन्न वाढ
देसाईगंज : धानाची रोवणी करीत असतांना पारंपरिक पद्धतीपेक्षा नवीन पद्धतीचा वापर केल्यास अधिकाधिक उत्पन्न येऊ शकते, धानाचे पीक घेण्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये श्री पद्धती अत्यंत कमी खर्चाची असून या पद्धतीत इतर पद्धतीने लागवड केलेल्या तुलनेत कमी पाणी व इतर संसाधनाची आवश्यकता अत्यल्प भासते. या तुलनेत श्री पद्धतीने लागवड केलेल्या पिकातून दीड ते दोन पट उत्पन्न घेता येते, अशी माहिती कृषी पर्यवेक्षक बी. एम. देशमुख, कृषी सहायक योगेश बोरकर यांनी कुरूड येथे पंढरी राऊत यांच्या शेतावर श्री पद्धत धान रोवणी प्रात्यक्षिकादरम्यान दिली.
श्री पद्धतीने धानाची लागवड केली असता केवळ ५ किलो बियाणांवर एक हेक्टर क्षेत्रावर धानाची रोवणी करता येते. एका चुडामध्ये ५० ते १५० पर्यंत फुटवे येण्याची क्षमता असते. त्याबरोबरच प्रचलित पद्धतीच्या तुलनेत १० ते १५ दिवस आधी पीक कापणीला येतो. या पद्धतीनुसार बांधीत पाणी साचवून ठेवायचे नसल्याने अत्यल्प पाण्यावरही सदर पीक घेतले जाते. देसाईगंज तालुक्यात धानाचे पीक वर्षातून दोनदा घेतले जात असल्याने बहुतांश शेतकरी श्रीपद्धतीनुसार धानाची रोवणी करीत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. इतरही शेतकऱ्यांनी श्रीपद्धतीचा वापर करून उत्पन्न वाढवावे असे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)