जागेअभावी तीन इमारती रखडल्या
By Admin | Updated: August 23, 2014 01:47 IST2014-08-23T01:47:38+5:302014-08-23T01:47:38+5:30
जिल्हा परिषदेच्यावतीने २०१३-१४ या वर्षात श्रेणी १ चे मुरमाडी, पळसगाव बोलेपल्ली या तीन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली.

जागेअभावी तीन इमारती रखडल्या
दिलीप दहेलकर गडचिरोली
जिल्हा परिषदेच्यावतीने २०१३-१४ या वर्षात श्रेणी १ चे मुरमाडी, पळसगाव बोलेपल्ली या तीन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली. मात्र या इमारतीसाठी संबंधीत गावात जागा उपलब्ध नसल्याने तिनही पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारती तात्पुरत्या रखडल्या असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. जिल्हा निर्मितीपासून ३२ वर्षाचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील तब्बल ३६ पशुवैद्यकीय दवाखाने भाड्याच्याच घरात असल्याचे वास्तव उजेडात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिनस्त श्रेणी १ चे ९२, श्रेणी २ चे ३९ व फिरते पशुचिकित्सालय ७ असे एकूण १३८ पशुवैद्यकी दवाखाने आहेत. या दवाखान्याच्या माध्यमातून गुराढोरांना औषधोपचार दिल्या जातो. मात्र गेल्या ३२ वर्षापासून ३६ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारती भाड्याच्या इमारतीत आहेत. यामुळे दवाखान्यात पुरेसा औषधसाठा ठेवण्यासाठी अडचण जात आहे. तसेच निवासस्थानाअभावी अनेक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तसेच कर्मचारी मुख्यालयी राहण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. स्वतंत्र प्रशस्त इमारतीअभावी दुर्गम भागातील गुराढोरांवर वेळेवर पुरेसा औषधोपचार करण्यास पशुसंवर्धन विभाग अपयशी ठरत आहे. जिल्ह्यात श्रेणी १ चे ५४ पशुसंवर्धन दवाखान्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र इमारती उभारल्या आहेत. तर श्रेणी १ च्या ४ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या चारही इमारती शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी खुल्या करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
नव्या इमारतीमध्ये गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब, आरमोरी तालुक्यातील कोरेगाव रांगी, कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी, धानोरा तालुक्यातील सुरसुंडी, रांगी व मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा समावेश आहे. जिल्हा निर्मितीपासून ३६ पशुवैद्यकीय दवाखान्यांना स्वतंत्र इमारती नाही. यात श्रेणी १ चे मुरमाडी, पळसगाव, येंगलखेडा, कोटरा, ग्यारापत्ती, चातगाव, गट्टा, गोडलवाही, झाडापापडा, मुधोली, तुमडी, जामगिरी, चौडमपल्ली, बोलेपल्ली, मोहुर्ली, दोलंदा, कोटमी, कचलेर, तोडसा, तोडगटा, बिडरी, कमलापूर, खेमनचेरू, नागेपल्ली, आवलमरी, इंदाराम, गुड्डीगुडम, किष्टापूर, मेडपल्ली, दामरंचा, कोलामाल, सोमनपल्ली तसेच श्रेणी २ चे गट्टा, हेडरी, राजाराम, बामणी आदी पशुवैद्यकीय दवाखान्यांचा समावेश आहे. स्वतंत्र इमारती नसल्याने या गाव परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या जनावरावर औषधोपचार करण्यास अडचण जात आहे. स्वतंत्र इमारती उभारण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.