हजारो शिक्षक अस्थायीच

By Admin | Updated: May 10, 2017 01:45 IST2017-05-10T01:45:28+5:302017-05-10T01:45:28+5:30

मागील २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना अजूनपर्यंत स्थायी व नियमित करण्यात आले नाही.

Thousands of teachers are temporary | हजारो शिक्षक अस्थायीच

हजारो शिक्षक अस्थायीच

दुजाभाव : आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना एकाच दिवशी केले स्थायी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना अजूनपर्यंत स्थायी व नियमित करण्यात आले नाही. दुसरीकडे मात्र आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या २७९ शिक्षकांना एका दिवसातच स्थायी करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या व कार्यरत राहणाऱ्या शिक्षकांमध्ये आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १६०० शाळांमध्ये जळपास ५ हजार शिक्षक पूर्ण झाले आहेत. ३ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकाला स्थायी व नियमित करणे आवश्यक आहे. मात्र १९८४ पासून कार्यरत असलेल्या हजारो शिक्षकांना अजूनपर्यंत नियमित व स्थायी करण्यात आले नाही. शिक्षकांनी स्थायी करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केले आहेत. मात्र सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेमध्येच पडून आहेत. २० वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या शिक्षकांना सुद्धा स्थायी करण्यात आले नाही. जिल्हा परिषदेचा उंबरठा झिजवून शिक्षक कमालीचे त्रस्त झाले आहेत. विविध प्रकारच्या त्रूट्या दाखवून सदर प्रस्ताव परत पाठविले जातात किंवा प्रलंबित ठेवले जात आहेत.
जिल्ह्यात काम करणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव पडून असताना आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या २७९ शिक्षकांना ४ मे रोजी एकाच दिवशी स्थायी केले आहे व त्यांना स्थायीत्वाचे प्रमाणपत्रही वितरित केले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांबाबत अशा प्रकारचे पक्षपाती धोरण अवलंबत असल्याने शिक्षकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. बाहेर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांच्या नोकऱ्या बळकावल्या आहेत. यामुळे या जिल्ह्यातील डीएड व बीएडधारक युवकांवर अन्याय झाला आहे.
आता हेच शिक्षक आपल्या स्वजिल्ह्यात परत जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा परिषद मात्र त्यांना रातोरात प्रमाणपत्र उपलब्ध करून देत आहे. या ठिकाणी नियमितपणे कार्यरत राहणाऱ्या शिक्षकांवर मात्र अन्याय केला जात आहे.

सेवानिवृत्तीचा लाभ मिळण्यास अडचण
सेवानिवृत्तीचा लाभ घेण्यासाठी संबंधित कर्मचारी नियमित व स्थायी होणे आवश्यक आहे. मात्र शिक्षण विभागातील अधिकारी शिक्षकांना सेवानिवृत्त होण्याच्या पूर्वीपर्यंत स्थायी व नियमित करीत नाही. पाच-सहा महिने सेवानिवृत्तीचा शिल्लक असताना त्याला स्थायी व नियमित केले जाते. कर्मचाऱ्याला नियमित होण्यासाठीही धडपड करावी लागते. सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्तीचा लाभ घेण्यासाठीसुद्धा कागदपत्रे गोळा करावी लागतात. परिणामी सेवानिवृत्तीचा लाभ मिळण्यास विलंब होतो.

 

Web Title: Thousands of teachers are temporary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.