झोपेसाठी गोळ्या खाणाऱ्यांना आहे हृदयविकाराचा धोका! आजच घ्या डॉक्टरांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 15:53 IST2025-02-28T15:52:22+5:302025-02-28T15:53:27+5:30
तणावरहित जीवनशैली गरजेची : परस्पर सेवन ठरू शकते घातक

Those who eat sleeping pills are at risk of heart disease! Consult a doctor today
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आहार, व्यायाम व पुरेशी झोपदेखील गरजेची असते. मात्र, काही जण झोप लागत नाही म्हणून गोळ्यांचे सेवन करतात. मात्र, ही सवय हृदयरोगाला निमंत्रण देणारी ठरू शकते. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्यांचे सेवन न करणेच हितावह आहे.
धावपळीच्या युगात आधीच ताणतणाव वाढले आहेत. दिवसभराचा थकता पुरेशी झोप घेऊन दूर करता येतो, पण मोबाइल, टीव्हीमुळे झोपेच्या वेळाकही कमी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत ताणतणाव दूर करण्यासाठी व झोपेसाठी गोळ्या सेवन करण्याचे प्रमाण अलीकडे वाढल्याचे चित्र आहे. मात्र, सतत गोळ्या खाऊन झोप घेतल्याने हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
डोक्यात डिग्री, 'पॅकेज'ची गणितं !
अनेक तरुण अभ्यासासाठी रात्र-रात्र जागतात. काही जणांच्या डोक्यात शिक्षणाचे तर काहींच्या डोक्यात पॅकेजचे गणित घोळत असते. मात्र, तणावरहित जीवनशैली आवश्यक आहे.
अपुरी झोप, तणावामुळे वाढते व्यसनाधीनता
काही जणांना झोपच लागत नाही म्हणून ते व्यसनाकडे वळतात. मद्यपान, धूम्रपान केल्याखेरीज झोप लागत नाही, अशा सवयीदेखील काहींना जडल्या आहेत.
मात्र, या सवयी घातक असून ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन २ करणे गरजेचे आहे. व्यसनापासूर दूर राहून शांतता, संयम व निरामय आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
रक्तदाबावर परिणाम
रात्रीच्या वेळी रक्तदाबाची पातळी दिवसाच्या पातळीपेक्षा जास्त असते, तसेच रात्री रक्तदाब वाढण्याची पद्धत, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि हृदय अपयशाच्या उच्च जोखमीशी संबंधित होती. त्यामुळे झोपेच्या गोळ्या टाळायला हव्यात.
हृदयरोगाची शक्यता, मेंदूवर परिणाम
दिवसा रक्तदाब नियंत्रित असला तरीही, ज्या रुग्णांना झोपेत असताना रक्तदाबात तीव्र घट झाली त्यांना झोपेत सामान्य रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या तुलनेत स्ट्रोकचा धोका लक्षणीयरीत्या जास्त होता. यामुळे मेंदूवरही परिणाम होऊ शकतो.
डॉक्टर, झोप येत नाही; औषध लिहून द्या !
काही रुग्ण चांगली झोप लागावी यासाठी डॉक्टरांकडे औषधी लिहून द्या, अशी विनवणी करतात. मात्र, सतत गोळ्या खाऊन झोप घेतल्याने शारीरिक गुंतागुंत वाढेल की काय, अशी भीती आहे.
"झोपेच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे चुकीचे आहे. प्रिस्क्रिप्शनशिवाय या गोळ्यांची विक्री करू नये, अशा सूचना आहेत. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. तणावरहित जीवनशैली, आहार-विहार उत्तम असेल तर झोपची समस्या उद्भवणार नाही."
- डॉ. मनीष मेश्राम, मानसोपचारतज्ज्ञ