रेस्ट हाऊसची उभारणी करीत आहे तिसरी पिढी
By Admin | Updated: July 12, 2014 23:38 IST2014-07-12T23:38:21+5:302014-07-12T23:38:21+5:30
१९६४ मध्ये आलापल्ली येथील कारागिराने साकारलेले भामरागड येथील वन विभागाचे लाकडी विश्रामगृह नव्याने साकारण्याचे काम कारागिराच्या तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी सध्या करीत आहे.

रेस्ट हाऊसची उभारणी करीत आहे तिसरी पिढी
काम वेगाने सुरू : भामरागडात साकारणार ‘जैसे थे’ लाकडी विश्रामगृह
भामरागड : १९६४ मध्ये आलापल्ली येथील कारागिराने साकारलेले भामरागड येथील वन विभागाचे लाकडी विश्रामगृह नव्याने साकारण्याचे काम कारागिराच्या तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी सध्या करीत आहे. येत्या दोन महिन्यात हे विश्रामगृह पुन्हा जनतेच्या सेवेत रूजू होणार आहे.
पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नदीच्या त्रिवेणी संगमावर हे विश्रामगृह उभारले. विश्रामगृह उभारण्यासाठी पूर्णपणे सागवान लाकडाचा उपयोग करण्यात आला. भिंत, फरशी आदींसह विश्रामगृहाचा संपूर्ण भाग लाकडानेच उभारला आहे. विश्रामगृहाच्या बांधकामासाठी सिमेंट, चुना आदी साहित्याचा वापर अजिबात करण्यात आला नाही. विश्रामगृह नैसर्गिकरीत्या वातानुकूलित होते. मात्र कालांतराने सदर वास्तू मोडकळीस आली. लाकडाच्या या इमारतीला वाळवी लागली. त्यामुळे लाकडी टेकूच्या साहाय्याने या विश्रामगृहाला उभे ठेवण्यात आले. आता मात्र ही वास्तू पूर्णत: जमीनदोस्त करून पुन्हा उभारण्याचे काम सुरू झाले आहे. १९६४ मध्ये सदर लाकडी विश्रामगृह आलापल्ली येथील भिमा सल्लम यांनी फार कष्ट घेऊन वनविभागासाठी उभे करून दिले होते. त्यावेळी याचे डिझाईनही त्यांनीच तयार केले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर भामरागड दौऱ्यावर येणार असल्याने सल्लम यांना बोलावून याची विश्रामगृहाची किरकोळ दुरूस्ती करण्यात आली होती. आता वन विभागाने ही इमारत पाडून पुन्हा तशीच उभारण्याचे काम हाती घेतले आहे. हे जुने विश्रामगृह पूर्णत: उकलताना याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे. तसेच फोटोग्राफीही करण्यात आली आहे, अशी माहिती भामरागडचे वनपरिक्षेत्राधिकारी खोब्रागडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. भिमा सल्लम यांचे नातू व्यंकटी पोचम सलम आलापल्ली हे आता नव्या विश्रामगृहाला उभारण्याचे काम हाती घेऊन आहे. आजोबांची निर्मिती पुन्हा करण्याचे काम आपल्यावर आले, याचा त्यांना अभिमान आहे, असे ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)