ते आले अन् सारेच अवाक् झाले!
By Admin | Updated: July 12, 2014 23:38 IST2014-07-12T23:38:47+5:302014-07-12T23:38:47+5:30
अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना प्रत्यक्ष अनुभवतांना सारंच स्वप्नवत वाटतं. तीन महिन्यापूर्वी अख्ख्या देशात खेड्यापाड्यातील जनमाणसांमध्ये चर्चेचा धुराळा उडविणाऱ्या व्यक्तीला भेटायला मिळणार या आशेने सारेच

ते आले अन् सारेच अवाक् झाले!
‘संस्काराचे मोती’ स्पर्धा : ऐतिहासिक स्थळांसह घेतली संसदेच्या परिसरातील माहिती
गोपाल लाजुरकर - गडचिरोली
अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना प्रत्यक्ष अनुभवतांना सारंच स्वप्नवत वाटतं. तीन महिन्यापूर्वी अख्ख्या देशात खेड्यापाड्यातील जनमाणसांमध्ये चर्चेचा धुराळा उडविणाऱ्या व्यक्तीला भेटायला मिळणार या आशेने सारेच जण चातकासारखी वाट बघत होते. संसदेच्या सभागृहातील मध्यभागातील एक खुर्ची रिकामीही ठेवली होती. या खुर्चीवर कोण बसणार याची पुसटसी कल्पनाही आम्हाला होती. परंतु प्रत्यक्ष भेटीचा योग के व्हा येणार, याची हुरहुर मनाला सतावत होती. नि तो क्षण १२ वाजून १५ मिनिटांनी आला आणि सर्वांची दीर्घकालिन प्रतीक्षा संपली. ते आले आणि सर्वजण अवाक् झाले! भारताच्या पंतप्रधानांना भेटण्याचा हा अत्यंत दुर्मिळ असा क्षण होता, अशी प्रतिक्रिया गडचिरोली जिल्ह्यातून ‘हवाई सफर’ साठी गेलेल्या श्रेयश विलास खवड याने ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.
हवाई सफरसाठी जिल्ह्यातून एकमेव निवड झाल्याने सुरूवातीपासूनच मनात अतिउत्साह होता. बालपणापासूनच विमानाविषयी विशेष आकर्षण होते. परंतु विमानात बसण्याची संधी आपल्याला येणार हे यत्किंचितही वाटत नव्हते. ९ जुलैला गडचिरोलीवरून नागपूरला रवाना झाल्यानंतर मनाला हवाई सफरचे लागलेले वेध सतावत होते. त्यामुळे ९ ची रात्रही हवाई सफरसाठी मनाच्या गगनात घिरट्या घालत होती. नि १० जुलैला हवाई सफरचा प्रत्यक्ष योग आला. सकाळी ५ वाजता मी मम्मीसोबत लोकमतभवन गाठले व त्यानंतर सकाळी ७.३० वाजता कधी न पाहिलेल्या एअरपोर्टवर इतर ९ सहकारी व व्यवस्थापकांसोबत जाऊन पोहोचलो. एअरपोर्टवर पोहोचताच विमान पाहून अक्षरश: मनातील आशेचे तरंग उल्हासित झाले. कधी विमान प्रत्यक्ष पाहिला तर नाहीच परंतु आज विमानात प्रत्यक्ष बसण्याची संधी मिळणार या भावनेने अतिउत्साह ओसंडून वाहत होता. सकाळी ८ वाजता सहकाऱ्यांसह विमानात बसलो. विमान उडाण घेताच सिटवरून घसरगुंडी घेतल्यागत झाले. परंतु काही क्षणातच विमान हवेत सुसाट झाल्याने पुन्हा सर्वकाही सामान्य वाटत होते.
दोन तासाच्या हवाई सफरनंतर सकाळी १० वाजता सर्वजण दिल्लीत पोहोचलो. १ बसगाडी आली व आम्हा सर्वांना इंडिया गेट मार्गावर घेऊन गेली. मात्र इंडिया गेटची प्रत्यक्ष अनुभूती आम्हाला बसमधूनच घ्यावी लागली. सर्वत्र गाड्या व माणसांचा चित्कार ऐकू येत होता. भव्य दिव्य असे इंडिया गेट पाहून मन आनंदीत झाले. यापूर्वी पुस्तकांमधील चित्रात व टीव्हीतील विविध वाहिन्यांवर इंडिया गेट पाहिले होते. परंतु आता प्रत्यक्ष इंडिया गेट पाहण्याची मजा काही औरच होती. परंतु ज्या उद्देशाने आम्ही सर्वजण दिल्लीत आलो होतो. तो योग आला. ११.३० वाजता हवाई सफरची टीम संसद भवन परिसरात पोहोचली. विस्तीर्ण परिसर व मोठमोठे गेट पाहून मनात भीती तर किंचित उत्साहही वाटत होता. व्यवस्थापकांनी सर्व मुलांना संसदेच्या एका सभागृहात नेऊन बसविले. सभोवताल खुर्च्या व मध्यभागी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. या खुर्चीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बसणार आहेत व आपल्याशी १५ मिनिटे मनमुराद गप्पाही मारणार आहेत, अशी कल्पना आम्हाला पूर्वीच देण्यात आली होती. व तो क्षण दुपारी १२.१५ वाजता आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलांच्या भेटीला आले व प्रत्येकाचा परिचय हिंदी व मराठीतून करून घेतला. तुमचे नाव काय, तुम्ही कुठून आलात यासह अनेक बाबींवर त्यांनी मुलांशी हसतमुखाने संवाद साधला.
मी सुध्दा आपला परिचय त्यांना हिंदीतूनच दिला. भारताचे पंतप्रधान आपल्याशी बोलले हे मला तर स्वप्नवतच वाटत होते. परंतु प्रत्यक्ष भेटीची अनुभूती ही मनाला जाणवत होती. १२.३० पर्यंत नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधल्यानंतर १२.३० वाजता पुढील सफरला सर्वजण निघाले. १२.४५ च्या दरम्यान जेवणासाठी एका हॉलमध्ये संपूर्ण टीमसह गेलो. कोबी, मुगाची डाळभाजी, पनीर, चण्याची उसळ, गुलाब जामुन, पुरी आदी मिष्ठाण्णाचा यथेच्छ आस्वाद सर्वांना घ्यायला मिळाला. त्यानंतर इतर स्थळांना भेटी देऊन सायंकाळी ६ वाजता एअरपोर्टला रवाना झालोत. सायंकाळी ७.१५ वाजता हवाई सफरची टीम दिल्लीतील विमानात बसली व रात्री ९.३० पर्यंत नागपूरला रवाना झाली. हवाई सफरचा परमोच्च आनंद घ्यायला मिळणे माझ्या दृष्टीने आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो, अशी प्रतिक्रिया श्रेयश विलास खवड याने ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.