पोलीस व नागरिकांमध्ये समन्वय असावा
By Admin | Updated: January 27, 2015 23:34 IST2015-01-27T23:34:02+5:302015-01-27T23:34:02+5:30
कायद्याची अंमलबजावणी व पालन करीत असताना पोलीस व नागरिकांमध्ये सतत सुसंवाद समन्वय असावा, असे प्रतिपादन राज्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.

पोलीस व नागरिकांमध्ये समन्वय असावा
पोलीस ठाण्यांचे उद्घाटन : पालकमंत्र्यांचे प्रतिपादन
कुरखेडा/कोरची : कायद्याची अंमलबजावणी व पालन करीत असताना पोलीस व नागरिकांमध्ये सतत सुसंवाद समन्वय असावा, असे प्रतिपादन राज्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
कुरखेडा व कोरची येथील पोलीस ठाण्यांच्या नवीन इमारतींचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कुरखेडा येथील कार्यक्रमाला खा. अशोक नेते, आ. क्रिष्णा गजबे, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, उपविभागीय अधिकारी तोंडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील अनेक वर्षांपासून कुरखेडा पोलीस स्टेशन भाड्याच्या खोलीत होते. अपुऱ्या जागेमुळे व सोयीसुविधांच्या अभावामुळे अनेक अडचणींचा सामना पोलिसांना करावा लागत होता. याची दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी पुढाकार घेऊन राज्य व केंद्र शासन यांच्या संयुक्त निधीतून नवीन इमारतीची निर्मिती करण्यात आली. संचालन व आभार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी केले.
कोरची येथील पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खा. अशोक नेते, आ. क्रिष्णा गजबे, पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, डी. सी. करतारसिंग, तहसीलदार विजय बारूडे, अभियंता भूषण समर्थ, धवड, मकसुदभाई आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना उपस्थित मान्यवरांनी पोलिसांच्या कार्याची मुक्तकंठाणे प्रशंसा केली. पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम म्हणाले की, राज्यात १० नवीन पोलीस स्टेशनच्या इमारती मंजूर झाल्या. त्यापैकी सात इमारती गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. इमारतींबरोबरच आधुनिक सेवा पोलिसांना पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन केले. कुरखेडा व कोरची येथील लोकप्रतिनिधींसह स्थानिक नागरिकही उपस्थित होते.