झिंगानूर परिसरातील बंधारा दुरुस्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:25+5:302021-06-06T04:27:25+5:30

झिंगानूर : झिंगानूर- सिरोंचा मार्गावर वन विभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व ...

There is no dam repair in Zinganoor area | झिंगानूर परिसरातील बंधारा दुरुस्ती नाही

झिंगानूर परिसरातील बंधारा दुरुस्ती नाही

झिंगानूर : झिंगानूर- सिरोंचा मार्गावर वन विभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्यजीवांसाठीही पाणी राहील, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, अल्प कालावधीतच बंधारा फुटला आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने याेग्य नियाेजन करून बंधाऱ्याची दुरुस्ती केली नाही.

गंजलेल्या खांबाने अपघाताचा धोका

गडचिराेली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र, या समस्येकडे कायम दुर्लक्ष आहे.

सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा

आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी आहे.

वनहक्क पट्ट्यापासून नागरिक वंचित

कोरची : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अमलात आणले आहे. मात्र, कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.

चातगावात कव्हरेजची समस्या भारी

धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाइल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाइलधारक त्रस्त झाले असून, टॉवर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. येथील बिघाडाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

धोडराज मार्गावर खड्डे, वाहनधारक त्रस्त

भामरागड : भामरागडवरून धोडराज पाच कि.मी. अंतरावर आहे. दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली आहे. धोडराजवासीय भामरागड येथे शासकीय कामानिमित्त येतात. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मागील वर्षी या मार्गाच्या दुरवस्थेत आणखी भर पडली.

विमा नसलेली वाहने धावतात रस्त्यावर

आष्टी : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

गॅस सिलिंडर योजनेचा बट्ट्याबोळ

आरमोरी : वन विभागामार्फत नागरिकांना, तसेच वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र, संपल्यानंतर सिलिंडर भरण्यासाठी लांब अंतराच्या गावांकडे जावे लागते. गॅस सिलिंडर रिफिलिंगच्या ठिकाणाचे योग्य नियोजन नसल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे.

पोर्ला बसस्थानकावर गतिरोधकाची मागणी

गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली- आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहन हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे.

जनावरांचे आरोग्य धोक्यात

गडचिरोली : पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

बांबू मिळत नसल्याने कामगार अडचणीत

गडचिराेली : तालुक्यात बुरूड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, वन विभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वन विभागाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी बुरूड बांधवांकडून होत आहे.

कुंभार समाजासाठी मंडळ स्थापन करावे

अहेरी : कुंभार समाजासाठी संत गोरोबा काका माती कला बोर्डाची स्थापना करावी, कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करावा, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्ण माफ करावी, वाहतूक व वीटभट्टी परवान्यातील जाचक अट रद्द करावी, कुंभार समाजाला ओळखपत्रावर परवाना व जळाऊ लाकूड देण्याची मागणी कुंभार समाज महासंघाने केली आहे.

रेडिअमअभावी अपघाताची शक्यता

देसाईगंज : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यांवर रेडिअम लावले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही.

जंगलव्याप्त परिसरात फिरणे टाळा

गडचिराेली : पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेले अनेक जण वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले असल्याच्या घटना घडत आहेत. त्या टाळण्यासाठी जंगलाव्याप्त परिसरात अंधाराच्या वेळेस फिरायला जाणे टाळावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

दुरुस्तीअभावी तलावांची दुरवस्था

चामाेर्शी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय कमी आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच शेती करावी लागत आहे. सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेला मामा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

रेगडी येथे बँक शाखा सुरू करा

घोट : घोटपासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या रेगडी येथे बँक शाखा स्थापना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी परिसरात २५ ते ३० गावांचा समावेश आहे. शिवाय येथे पोलीस मदत केंद्र, शासकीय आश्रमशाळा, धर्मराव हायस्कूल, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत.

अनेक वाॅर्डांतील नाल्यांची दुरवस्था

गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्याने किरकोळ अपघात घडताहेत.

मोहलीचा मनाेरा ठरताेय कुचकामी

धानोरा : तालुक्यातील मोहली येथे बीएसएनएलचा मनोरा आहे; परंतु त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दूधमाळा, गिरोला, गोडलवाही आदी ठिकाणी भ्रमणध्वनी मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्मशानभूमींची दुरवस्था वाढली

कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी, ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.

मामिडिताेगूजवळ पूल बांधण्याची मागणी

झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडितोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होते.

Web Title: There is no dam repair in Zinganoor area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.