अहेरीत दुसऱ्या दिवशीही उपविभागीय कार्यालयाला टाळे, कामकाज ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 11:17 AM2023-08-30T11:17:15+5:302023-08-30T11:19:12+5:30

निलंबित कर्मचारी आले, तीन तास थांबून गेले

The sub-divisional office in Aheri was closed on the second day to, work stopped | अहेरीत दुसऱ्या दिवशीही उपविभागीय कार्यालयाला टाळे, कामकाज ठप्प

अहेरीत दुसऱ्या दिवशीही उपविभागीय कार्यालयाला टाळे, कामकाज ठप्प

googlenewsNext

अहेरी (गडचिरोली) : कामचुकार कर्मचाऱ्यांना ताळ्यावर आणण्यासाठी येथे उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी शिपाई वगळता, सर्वच कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारला होता. २९ ऑगस्टला दुसऱ्या दिवशीही आस्थापनेला कुलूप होते. निलंबित कर्मचारी कार्यालयात आले व तीन तास थांबून परत गेले.

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी गडचिरोलीत काही कर्मचारी केवळ मंगळवार ते गुरुवार हे तीनच दिवस पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहतात. दुर्गम भागात सेवा देण्यास कर्मचारी निरुत्साही असतात. असाच काहीसा प्रकार येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात होता. तंबी देऊनही कामकाजात सुधारणा न केल्याने २९ ऑगस्टला उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी शिपाई वगळता, सर्वच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर आस्थापना शाखेला कुलूप लावले. विहित मुदतीत कामे न करता प्रलंबित ठेवणे, कामचुकारपणा करणे, सामान्यांना सेवा देण्यात हलगर्जीपणा करणे, वरिष्ठांचे आदेश न पाळणे व बेशिस्तपणा करणे असा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, २९ ऑगस्टला सकाळी शिपायाने कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार उघडले. वैभव वाघमारे हे बैठकीसाठी गडचिरोलीला गेले होते. त्यावेळी कार्यालयात दिवसभर केवळ शिपाई होता. सकाळी ११ वाजता निलंबित कर्मचारी आलेे; पण आस्थापना शाखेला टाळे होते. तीन तास कार्यालयात रेंगाळलेले हे कर्मचारी नंतर निघून गेले. यामुळे दुसऱ्या दिवशीही कार्यालय ओस पडलेले होते.

मेळघाटात गाजली होती कारकीर्द

दरम्यान, वैभव वाघमारे यांची प्रशासनात कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख आहे. ते मूळचे पंढरपूर (जि. सोलापूर) येथील असून, २०१९ च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते मेळघाट येथे आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. आदिवासींसाठी मोहफूल बँकेसारखे उपक्रम राबवून त्यांनी अल्पावधीत छाप सोडली. कोरोना काळातही त्यांच्या उल्लेखनीय कार्याची चर्चा झाली.

२०२१ मध्ये अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ते देशभरात चर्चेत आले होते. जीवनात काहीतरी अजून चांगले व उदात्त करण्याच्या शोधापोटी आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांच्या समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर निर्णय मागे घेत ते अहेरी येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांच्याकडे सध्या अहेरीच्या आदिवासी प्रकल्प विभागाचाही प्रभारी भार आहे.

Web Title: The sub-divisional office in Aheri was closed on the second day to, work stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.