'परिस्थिती बदललीयं, शस्त्रे सोडा, मुख्य प्रवाहात या...' आत्मसमर्पण केलेल्या भूपतीचे नक्षलवाद्यांना आवाहन
By संजय तिपाले | Updated: November 1, 2025 15:59 IST2025-11-01T15:58:02+5:302025-11-01T15:59:27+5:30
आत्मसमर्पित माओवादी नेता भूपतीचे आवाहन : केंद्रीय समितीच्या आरोपांचे खंडण

'The situation has changed, give up weapons, come into the mainstream...' Surrendered Bhupathi appeals to Naxalites
गडचिरोली : माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने शस्त्रबंदीचा प्रस्ताव नाकारल्यानंतर जहाल नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ अभय याने ६० सहकाऱ्यांसह येथे १५ ऑक्टोबर रोजी शरणागती पत्करली होती.
त्यानंतर केंद्रीय समितीने त्यास 'गद्दार' संबोधून डिवचले होते. तथापि, त्याच्यावर टोकाचे आरोप केले होते. अखेर १ नोव्हेंबरला या सर्व आरोपांचे खंडण करुन भूपती याने जिल्हा पोलिसांच्या सहाय्याने एक चित्रफीत जारी केली, यात त्याने चळवळीत सक्रिय माओवाद्यांना 'आता परिस्थिती बदललीयं.. शस्त्रे सोडा अन् मुख्य प्रवाहात या...' असे आवाहन केले आहे.
भूपती याने आपल्या ६० साथीदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. या ऐतिहासिक शरणागतीनंतर तिकडे छत्तीसगडच्या बस्तरमध्ये जहाल नेता रुपेशसह तब्बल २१० माओवाद्यांनी शस्त्र सोडले होते. पाठोपाठ जहाल नेता व केंद्रीय समिती सदस्य पुल्लरीप्रसाद उर्फ चंद्रन्ना आणि तेलंगण राज्य समिती सदस्य बंडी प्रकाश उर्फ प्रभात यांनी २८ ऑक्टोबर रोजी आत्मसमर्पण केले होते. यामुळे माओवादी चळवळीला जबर हादरा बसला होता. दरम्यान, केंद्रीय समितीने भूपती, रुपेश यांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती, एवढेच नाही तर 'गद्दार', 'फितूर' असे शब्दप्रयोग करुन आगपाखड केली होती. आत्मसमर्पणानंतर १ नोव्हेंबर रोजी भूपती याने पहिल्यांदाच ५ मिनिटे १७ सेकंदाची एक चित्रफीत जिल्हा पोलिसांच्या मदतीने जारी केली, यात त्याने म्हटले आहे की, १६ सप्टेंबर रोजी आपण पहिल्यांदा शस्त्रबंदीचा विचार व्यक्त केला होता. त्यानंतर ६० सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले. मात्र, ही भूमिका बदलत्या परिस्थितीला अनुसरुन आहे. बदलत्या परिस्थितीचे काही संकेत असतात, ते ओळखले पाहिजेत शस्त्रे सोडून कायद्याच्या चौकटीत राहून जनतेसाठी काम करण्याचा आमचा निर्णय आहे. केंद्रीय समितीच्या कथित गद्दार शब्दप्रयोगाबद्दल खंत व्यक्त करुन भूपतीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
समर्थनासाठी मोबाइल क्रमांक केला जारी
आम्ही घेतलेल्या निर्णयावर चळवळीत सक्रिय माओवाद्यांनी शांत डोक्याने विचार करावा, असे आवाहन भूपतीने केले आहे. सुज्ञ नागरिक, आदिवासींनी आमच्या भूमिकेचे समर्थन करावे, आपले अभिप्राय द्यावेत, असे आवाहन करत त्याने स्वत:चा व रुपेश याचा मोबाइल क्रमांक देखील जाहीर केला आहे.
आणखी एक चित्रफित येणार
छत्तीसगडमध्ये चकमकीत सप्टेंबर २०२५ मध्ये ठार झालेला जहाल नेता कट्टा रामचंद्र रेड्डी उर्फ राजू दादा याची पत्नी शांतीप्रियाने ३१ ऑक्टोबर रोजी आत्मसमर्पित माओवाद्यांनी पतीची हत्या घडवून आणली, असा सनसनाटी आरोप केला होता. तिने भूपती व रुपेश यांचा नामोल्लेख करुन थेट टीका केली होती. मात्र, या आरोपांवर भूपतीने खुलासा केला नाही. आणखी एक चित्रफीत जारी करणर असल्याचे त्याने शेवटी नमूद केले, या चित्रफितीची उत्सुकता वाढली आहे.