जंगल जांभळांनी लगडले; मात्र प्रक्रिया उद्याेगाअभावी लंगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 21:27 IST2022-06-30T21:26:53+5:302022-06-30T21:27:19+5:30
Gadchiroli News गडचिराेली जिल्ह्यात जांभळाचे जंगल काेरची व कुरखेडा तालुक्यात आहे. येथे उच्च दर्जाची जांभळे आढळतात. परंतु जिल्ह्यात प्रक्रिया उद्याेग नसल्याने नैसर्गिकरीत्या उत्पादित जांभळे बाहेर जिल्ह्यात पाठविण्याच्याच कामी येतात.

जंगल जांभळांनी लगडले; मात्र प्रक्रिया उद्याेगाअभावी लंगडले
गडचिराेली : जांभूळ फळाचे नाव ऐकताच ताेंडाला पाझर फुटताे. काळसर निळ्या रंगाचे हे जांभूळ रंग व गाेडव्यामुळेच रंगालाही फळाचे नाम धारण केलेले फळ आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. मधुमेहासह विविध आजारांवर औषधी म्हणून हे फळ उपयुक्त असून, दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हे फळ परिपक्व हाेत असून, पाऊस पडल्यानंतरच ही फळे पिकतात.
गडचिराेली जिल्ह्यात जांभळाचे जंगल काेरची व कुरखेडा तालुक्यात आहे. येथे उच्च दर्जाची जांभळे आढळतात. याशिवाय अन्य ठिकाणीही जांभळाची झाडे आढळत असली तरी त्यांचा आकार लहान आहे. जांभळाचे माेठ्या प्रमाणात उत्पादन हाेते. त्यापासून विविध प्रकारचे पदार्थ तयार करता येतात; परंतु जिल्ह्यात प्रक्रिया उद्याेग नसल्याने नैसर्गिकरीत्या उत्पादित जांभळे बाहेर जिल्ह्यात पाठविण्याच्याच कामी येतात.
जांभळात काेणती तत्त्वे?
- जांभळात लाेहाचे प्रमाण अधिक असते. रक्ताच्या शुद्धिकरणासाठी, पंडूराेग, कावीळ आदी विकारांवर जांभूळ उपयाेगी आहे. जांभळाच्या झाडाची पाने आणि सालही विविध रोगांवर उपयोगी आहे. पित्त, हातापायाची जळजळ, उलट्या, हिरड्यांची सूज कमी करणे, दातांमधून रक्त बाहेर येत असल्यास जांभळाची साल किंवा पाने उपयाेगी ठरतात.
- मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी जांभूळ फायदेशीर ठरते. यातील तुरटपणा फायदेशीर ठरताे. जांभळाच्या बियांचे चूर्ण राेज खावे तसेच पिकलेली जांभळे वाळवून त्याची पूड करावी, ही पूड एक ते दीड चमचा राेज पाण्यासाेबत प्यावी, असे केल्याने काही दिवसातच लघवीतून साखर बाहेर पडणे बंद हाेईल.
जांभळाचा रसही फायदेशीर
जांभळाची साल, फळे जेवढी उपयुक्त आहे, तेवढीच त्याची पानेही उपयुक्त आहेत. जांभळाच्या पानांचा रसही दिवसातून दाेन वेळा, अशा पद्धतीने पाच-सहा दिवस घेतल्यास अतिसारावर नियंत्रण मिळू शकते. तसेच सालीच्या काढ्याने गुळण्या केल्यास ताेंड येण्याचा त्रास थांबताे. चेहऱ्यावर उठणाऱ्या पुटकुळ्या, मुरूम आदींवर जांभळाची साल उगाळून लावल्यास तत्काळ परिणाम दिसताे. पित्तामुळे उलटी हाेत असल्यास जांभळाची दाेन ते तीन हिरवी पाने पाण्यात उकळून व गाळून मधासाेबत घेतल्यास पित्त दूर हाेताे, तसेच उलट्याही थांबतात.