नक्षलवादाचा शेवट जवळ! 'लास्ट फायटर' पापा राव आज शरणागती पत्करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:02 IST2026-03-24T12:01:47+5:302026-03-24T12:02:31+5:30
बस्तरला नक्षलमुक्त घोषित करण्याच्या डेडलाईनच्या अवघ्या एक आठवडा आधी, नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा आणि शेवटचा 'फायटर' समजला जाणारा कमांडर पापा राव अखेर २४ मार्च रोजी शरणागती पत्करणार आहे.

नक्षलवादाचा शेवट जवळ! 'लास्ट फायटर' पापा राव आज शरणागती पत्करणार
गडचिरोली: छत्तीसगडमधील नक्षलवादाचा कणा आता पूर्णपणे मोडला आहे. बस्तरला नक्षलमुक्त घोषित करण्याच्या डेडलाईनच्या अवघ्या एक आठवडा आधी, नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा आणि शेवटचा 'फायटर' समजला जाणारा कमांडर पापा राव अखेर २४ मार्च रोजी शरणागती पत्करणार आहे. आपल्या साथीदारांसह आणि एके- ४७ सारख्या अत्याधुनिक शस्त्रांसह तो पोलिसांसमोर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे बस्तरमधील नक्षली चळवळ आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे.
५६ वर्षीय पापा राव उर्फ मंगू हा सुकमा जिल्ह्याचा रहिवासी आहे. सध्या तो दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य असून पश्चिम बस्तर डिव्हिजन कमिटीचा इन्चार्ज आहे. बस्तरच्या जंगल आणि जमिनीची त्याला खडानखडा माहिती असल्याने अनेकवेळा पोलिसांच्या चकमकीतून तो अगदी थोडक्यात बचावला होता. जहाल नक्षलवादी 'देवजी' याने शरणागती पत्करल्यानंतर पापा राव हा एकमेव मोठा लढाऊ कमांडर शिल्लक राहिला होता.
एका वर्षात संघटनेची वाताहत
गेल्या एका वर्षात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांची मोठी फळी उद्ध्वस्त केली आहे. खूंखार नक्षली माडवी हिडमा, सचिव बसवाराजू आणि गणेश उइके यांच्यासह १७ बड्या नेत्यांचा खात्मा करण्यात आला. भूपती, रुपेश आणि रामधेर यांसारख्या नेत्यांनी शेकडो साथीदारांसह शस्त्रे खाली ठेवली आहेत.
नक्षलवाद्यांचा एमएमसी झोन ( मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड) आता पूर्णपणे साफ झाला असून, उत्तर बस्तर आणि माड विभागातूनही नक्षल्यांचे अस्तित्व संपले आहे.
आता फक्त 'हे' दोनच उरले...
पापा रावच्या शरणागतीनंतर आता नक्षलवादी संघटनेत फक्त दोनच मोठे चेहरे उरले आहेत, ज्यांच्या अटकेनंतर नक्षलविरोधी ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी मानले जाईल. मुपल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती: याच्यावर ३.५ कोटींचे इनाम आहे. हा नक्षलवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड मानला जातो. २००३ मध्ये चंद्राबाबू नायडू यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा हाच सूत्रधार होता. मिशिर बेसरा उर्फ भास्कर: १.३० कोटींचे इनाम असलेला बेसरा हा 'अँब्युश' (सापळा) लावण्यात माहीर मानला जातो.
बस्तर होणार नक्षलमुक्त?
एकेकाळी हजारो सशस्त्र कॅडर असलेल्या नक्षलवादी संघटनेकडे आता केवळ २०० ते ३०० सक्रिय सदस्य उरले आहेत. तेही आता छोट्या तुकड्यांमध्ये इकडे-तिकडे लपून बसले आहेत. पापा रावच्या शरणागतीमुळे पश्चिम बस्तरची कमिटी आता पूर्णपणे विखुरली जाणार असून, बस्तरमध्ये शांततेचा नवा सूर्योदय होणार आहे.