हत्तींनी बैलाला चिखलात तुडवून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 11:03 PM2022-11-08T23:03:44+5:302022-11-08T23:04:13+5:30

तलवारगडधील घटनेनंतर जंगली हत्तींच्या कळपाने गांगीन, प्रतापगडच्या दिशेने आगेकुच केली. या हत्तींनी गांगीनमधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हिरालाल चमरू नैताम यांच्या बैलाला पायाने तुडवून चिखलात गाडले. मृत बैलाचे चिखलात पूर्णपणे माखलेले पाय तेवढे ओळखायला येत होते. बैलाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे साधारण २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. 

The elephants killed the bull by trampling it into the mud | हत्तींनी बैलाला चिखलात तुडवून मारले

हत्तींनी बैलाला चिखलात तुडवून मारले

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यातील तलवारगडमधील वृद्धाला जीवानिशी मारल्यानंतर जंगली हत्तींनी गांगीन या गावातील शेतकऱ्याच्या एका बैलाला चक्क पायांनी तुडवून चिखलात गाडले. या प्रकारामुळे शेतकरीवर्ग आणखीच भयभीत झाला आहे. 
तलवारगडधील घटनेनंतर जंगली हत्तींच्या कळपाने गांगीन, प्रतापगडच्या दिशेने आगेकुच केली. या हत्तींनी गांगीनमधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हिरालाल चमरू नैताम यांच्या बैलाला पायाने तुडवून चिखलात गाडले. मृत बैलाचे चिखलात पूर्णपणे माखलेले पाय तेवढे ओळखायला येत होते. बैलाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे साधारण २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. 
जंगली हत्तींनी शेतीच्या व घराच्या केलेल्या नुकसानीमुळे वन विभागाने स्थानिक पातळीवर जाऊन पंचनामे करणे गरजेचे आहे; पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाकडे हेलपाटे मारावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 
शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करणे, कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, स्टॅम्प पेपर घ्यायला लावणे ही कामे सांगून शेतकऱ्यांच्या जखमेवर वन विभागाचे कर्मचारी मीठ चोळत असल्याची भावना काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 
शेतकऱ्यांना वनविभागाने अशा पद्धतीने त्रास देऊ नये, अशी अपेक्षा केली जात आहे. वनविभागाने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवून आवश्यक असलेली कागदपत्रे स्थानिक पातळीवर उपलब्ध करून पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

एका दिवसात पार केले ४० किलोमीटरचे अंतर
गांगीन प्रतापगड येथे नुकसान केल्यानंतर हे हत्ती कुठे गेले आहेत याचा शोध लागत नसल्याने मुरुमगाव, मालेवाडा आणि बेळगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले होते. हत्तींचा माग काढला तेव्हा ते रात्रभरातून ३० ते ४० किलोमीटर अंतर चालून पुराडा वनपरिक्षेत्रातील लवारीच्या जंगलात असल्याची माहिती पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोले यांनी दिली. मंगळवारी कुठेही जंगली हत्तींनी नुकसान केल्याची घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘त्या’ आदिवासी वृद्धाचा मृतदेह २४ तास गावातच पडून

मुरुमगाव वनपरिक्षेत्रातील तलवारगड या गावामध्ये शुक्रवारी सायंकाळी हत्तींनी पायाने तुडवून ठार केलेल्या धनसिंग टेकाम (७१ वर्ष) यांचा मृतदेह २४ तास गावातच पडून राहिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम बंगालवरून आलेली हुल्ला टीम वेळेवर कार्यरत असती, तर वृद्धाचा मृतदेह गावात पडून राहिला नसता. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 
- मुरुमगावचे आरएफओ अविनाश भडांगे यांनी सांगितले की, हत्तीपासून बचाव करीत गावात जाणे अडचणीचे असल्यामुळे उशीर झाला. मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाकडून २० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव तयार करीत आहे. हुल्ला टीमचे सदस्य फक्त सातच लोक असल्याने हत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे गडचिरोली व वडसा डिव्हिजनसाठी वेगवेगळ्या दोन टीम देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

 

Web Title: The elephants killed the bull by trampling it into the mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.