तोंडाला रुमाल बांधून थांबले तहसीलदार, दुचाकीवर जाऊन पकडले वाळूचे टिप्पर !
By संजय तिपाले | Updated: November 7, 2025 16:14 IST2025-11-07T16:13:05+5:302025-11-07T16:14:06+5:30
Gadchiroli : शहरातील कोटगल मार्गावरील टी - पाईंटजवळ तहसीलदार शुभम पाटील यांनी ५ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजता बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे एक विनाक्रमांकाचे टिप्पर पकडले होते.

Tehsildar stopped with a handkerchief tied to his face, went on a bike and caught a tipper of sand!
गडचिरोली : प्रशासनाच्या नाकावर टिच्चून राजरोस वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांना तहसीलदार शुभम पाटील यांनी जोरदार दणका दिला. शहरात दोन दिवसांत तीन टिप्पर पकडून दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. विशेष म्हणजे माफियांनी हेरगिरीसाठी जागोजाग पेरलेल्या 'पंटर'ला चकवा देत तहसीलदारांनी बडगा उगारल्याची माहिती आहे.
शहरातील कोटगल मार्गावरील टी - पाईंटजवळ तहसीलदार शुभम पाटील यांनी ५ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजता बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे एक विनाक्रमांकाचे टिप्पर पकडले होते. ते जप्त करुन दंडात्मक कारवाई करत पुढील कारवाईसाठी प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांना धाडला. त्यानंतर ६ नोव्हेंबरला धानोरा मार्गावरील लाझेंडा येथून विनाक्रमांकाचे दोन टिप्पर वाळू घेऊन जात असल्याच्या माहितीवरुन त्यांनी सापळा रचला. अनेकदा माफियांचे पंटर अधिकाऱ्यांची हेरगिरी करत वाळूच्या वाहनांना वाट मोकळी करुन देत असतात. या पार्श्वभूमीवर ६ नोव्हेंबरला दुपारी तहसीलदार पाटील यांनी आपले शासकीय वाहन निवासस्थानी लावले. तहसीलदार घरी असल्याचे समजून माफियांनी वाळूचे दोन टिप्पर रवाना केले.
तोंडाला रुमाल बांधून थांबले तहसीलदार
कारवाईसाठी तहसीलदार पाटील हे एका कार्यालयीन सहकाऱ्यास सोबत घेऊन दुचाकीवरुन दुपारी घराबाहेर पडले. तोंडाला रुमाल बांधून ते लाझेंडा येथे एक तास रस्त्यात उभे होते. वाहने येताच ती अडवून वाहतूक परवाना मागितला. परवाना न आढळल्याने दोन्ही वाहने ताब्यात घेऊन कार्यालयात जमा केली. मंडळाधिकारी आर. पी सिडाम, महसूल अधिकारी आर. पी. जाधव आदींनी पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली.