शिक्षकांनी सानेगुरूजींची भूमिका बजावावी
By Admin | Updated: August 16, 2014 23:29 IST2014-08-16T23:29:15+5:302014-08-16T23:29:15+5:30
नागपूर विभागात प्रथमच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा आदिवासी विभागाने निर्माण केली आहे. शाळेत अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शिक्षकांनी सानेगुरूजींची भूमिका बजावावी
इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे उद्घाटन : आर. आर. पाटील यांचे प्रतिपादन
गडचिरोली : नागपूर विभागात प्रथमच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा आदिवासी विभागाने निर्माण केली आहे. शाळेत अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे अत्याधुनिक सोयीसुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षकांनी साने गुरूजींची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले.
सेमाना मार्गावरील इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, आदिवासी उपआयुक्त विनोद पाटील उपस्थित होते. २६ कोटी रूपये खर्च करून इमारतीचे बांधकाम करण्यात आले. सर्वसोयीयुक्त अशी ही इमारत आहे. त्यामुळे शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेची आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आवश्यकता होती. यामुळे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय होण्यास या इमारतीच्या माध्यमातून मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन शाळेचे नावलौकिक करावे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, विद्यार्थ्यांचे समस्या सोडविल्या जातील, असेही पालकमंत्री आर. आर. पाटील म्हणाले. आदिवासी विभागाने नावीन्यपूर्ण योजना राबवून न्युक्लीअस बजेटमधून निधी उपलब्ध करून द्यावा, असे मान्यवरांनी स्पष्ट केले. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी खडतकर यांनी केले. यावेळी लेखाधिकारी राठोड, शाळेचे मुख्याध्यापक गोगुलवार, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)