कोरोनाविरुद्धच्या लढाईत सुविधांसाठी सरसावले शिक्षकांचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 05:00 IST2021-05-12T05:00:00+5:302021-05-12T05:00:29+5:30

कोरोनाच्या दहशतीमुळे सर्व ठिकाणी लस घेण्यासाठी लोक सरसावले आहेत, पण बऱ्याच लसीकरण केंद्रात लांब रांगा लागत असल्याने केंद्राबाहेर अनेकांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत होते. तालुक्यातील शिक्षकवृंदांनी ‘एक हात मदतीचा’ असा उपक्रम राबवत सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चामोर्शीमध्ये कार्यरत शिक्षक, प्राध्यापकांसह तालुका व जिल्ह्याबाहेरील शिक्षक, एवढेच नाही तर इतर क्षेत्रातील दात्यांनी मदतीचा हात पुढे केला.

Teachers' hands in the fight against Corona for facilities | कोरोनाविरुद्धच्या लढाईत सुविधांसाठी सरसावले शिक्षकांचे हात

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सुविधांसाठी सरसावले शिक्षकांचे हात

ठळक मुद्देएक हात मदतीचा उपक्रमातून जागविली सामाजिक बांधीलकी

लाेकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : कोरोनाबाधितांचे प्रमाण ग्रामीण भागातही बरेच वाढले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कोविड केअर सेंटरमधून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय लसीकरणासाठीही रांगा लागत आहेत, पण अनेक ठिकाणी पुरेशा सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. चामोर्शी तालुक्यातील शिक्षकवृंदांनी पुढाकार घेऊन विविध सुविधांसाठी मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधीलकीचा परिचय  दिला. 
कोरोनाच्या दहशतीमुळे सर्व ठिकाणी लस घेण्यासाठी लोक सरसावले आहेत, पण बऱ्याच लसीकरण केंद्रात लांब रांगा लागत असल्याने केंद्राबाहेर अनेकांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत होते. तालुक्यातील शिक्षकवृंदांनी ‘एक हात मदतीचा’ असा उपक्रम राबवत सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चामोर्शीमध्ये कार्यरत शिक्षक, प्राध्यापकांसह तालुका व जिल्ह्याबाहेरील शिक्षक, एवढेच नाही तर इतर क्षेत्रातील दात्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यातून चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णाच्या आवारात स्थायी शेड, तर ७ ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रीन नेट लावण्यात आली. यामुळे रांगेत उभे राहणाऱ्यांचा उन्हाच्या  त्रासापासून  बचाव  होत  आहे.
हा उपक्रम राबविण्यासाठी प्रवीण पोटवार, आशिष जयस्वाल, प्रदीप भुरसे, सुजित दास, माणिकचंद रामटेके, संतोष गुट्टे व सचिन गायधने या शिक्षकांनी पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे युवा संकल्प संस्था  भेंडाळा यांनी हिरिरीने सहभागी होऊन मोलाचा हातभार लागला. त्यामध्ये  युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागड, उपाध्यक्ष चेतन कोकावार, सुबीर मिस्त्री, विशाल बंडावार, प्रशांत कुसराम, वैभव मंगर यांनी सहकार्य केले. पुढेही या प्रकारची मदत सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
उत्तम संस्कारातून नवी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांनी सामाजिक बांधीलकी जपत एक चांगला आदर्श आपल्या कृतीतून समाजासमोर ठेवल्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने, डॉ. शेषराव भैसारे, औषध निर्माण अधिकारी प्रतीक पुनप्रेड्डीवार, राजेश ढाले, उमेश राठोड, कुशल कवठेकर, चंद्रकांत गव्हारे आणि समस्त रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले. इतरही तालुक्यात असे उपक्रम हाेण्याची गरज आहे.

येणाऱ्यांना मिळाली मायेची सावली
- लसीकरणासाठी येणाऱ्या सामान्य लोकांना आरोग्य केंद्रात गर्दी असल्याने भर उन्हात बराच वेळ उभे राहावे लागत होते. त्यामुळे चक्कर येणे, बीपी वाढणे व इतर समस्या उद्भवत होत्या. एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत जमा झालेल्या निधीतून सर्वानुमते ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे कायमस्वरूपी पत्र्याचे शेड बांधले.
- चामोर्शी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे लसीकरण केंद्रासमोर हिरवी नेट बांधून सावलीची व्यवस्था करण्यात आली. आता या कायमस्वरूपी शेड व हिरव्या नेटच्या व्यवस्थेमुळे सामान्य नागरिकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अशी मदत मोलाची ठरणार आहे.

 

Web Title: Teachers' hands in the fight against Corona for facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.