गडचिरोलीत शिक्षक भरती रखडली, शेकडो पदे अद्याप रिक्त!
By दिलीप दहेलकर | Updated: August 13, 2025 17:46 IST2025-08-13T17:46:10+5:302025-08-13T17:46:39+5:30
प्रशासन झाले हतबल : भरती प्रक्रिया बंद, जिल्हा परिषद शाळांना नवे शिक्षक आणायचे कुठून?

Teacher recruitment in Gadchiroli stalled, hundreds of posts still vacant!
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तांत्रिक अडचणी व न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची पदभरती गेल्या दोन वर्षापासून रखडली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात आतापर्यंत दोन ते तीन टप्प्यांत कंत्राटी स्वरूपात मानधन तत्त्वावर शिक्षकांची शाळांवर ५५० जणांची नियुक्ती केली. मात्र, अजूनही ४५० शिक्षकांची कमतरता आहे.
शहरात ठाण मांडून बसलेल्या काही खास शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्याही रद्द केल्या. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रात नियमित शिक्षकांची बरीच पदे रिक्त आहेत. नॉन पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मात्र, पेसा क्षेत्राच्या तुलनेत रिक्त जागांची संख्या कमी आहे.
पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे स्थानिक आदिवासी उमेदवारांमधून भरण्याचा निर्णय राज्य शासनाने सन २०२३ मध्ये घेतला होता. त्यानुसार आदिवासी लोकसंख्येच्या अहिल्यानगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ आदी जिल्हा परिषदांना शिक्षक भरतीसाठी हिरवा कंदिल मिळाला. मात्र, बिगर आदिवासी संघटनांनी भरती प्रक्रियेविरोधात याचिका दाखल केली. त्यामुळे भरती प्रक्रियेला स्थगिती दिली. तेव्हापासून तिढा कायम आहे.
शैक्षणिक नुकसान नाही
रिक्त असलेल्या जागांवर यंदा तब्बल ५५० कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजूनही शेकडो शिक्षकांची आवश्यकता आहे. असे असले तरी शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) विवेक नाकाडे यांनी दिली.