भरधाव ट्रकच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू, गडचिराेली शहरातील घटना, ट्रॅफिक अव्यवस्थेने घेतला बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:48 IST2025-12-10T13:48:12+5:302025-12-10T13:48:35+5:30
Gadchiroli Accident News: गडचिराेली शहराच्या कॉम्प्लेक्स भागातून धानोरामार्गे कार्मेल शाळेकडे जाताना दुचाकी ट्रकच्या चाकात सापडून झालेल्या भीषण अपघातात शिक्षिका जागीच ठार झाल्याची घटना १० डिसेंबर राेजी बुधवारला सकाळी ८.३० वाजताच्या समारास शहरातील चंद्रपूर रोडवर सुचक यांच्या जलाराम दुकानासमोर घडली.

भरधाव ट्रकच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू, गडचिराेली शहरातील घटना, ट्रॅफिक अव्यवस्थेने घेतला बळी
गडचिराेली - शहराच्या कॉम्प्लेक्स भागातून धानोरामार्गे कार्मेल शाळेकडे जाताना दुचाकी ट्रकच्या चाकात सापडून झालेल्या भीषण अपघातात शिक्षिका जागीच ठार झाल्याची घटना १० डिसेंबर राेजी बुधवारला सकाळी ८.३० वाजताच्या समारास शहरातील चंद्रपूर रोडवर सुचक यांच्या जलाराम दुकानासमोर घडली. ममता धर्माजी बांबोळे (४०) रा. गडचिरोली असे मृतक शिक्षिकेचे नाव आहे.
एमएच ३४ बी. झेड. १११३ क्रमांकाचा ट्रक सिमेंट बॅग भरून बल्लारपूर येथून चंद्रपूरमार्गे आरमाेरीकडे जात हाेता. शिक्षिका ममता बांबोळे हया नेहमीप्रमाणे याच मार्गे शाळेत जात हाेत्या. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्लिप हाेत त्या मागच्या चाकाखाली आल्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. पाेलिसांनी त्यांना लागलीच येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले मात्र १५ मिनिटातच त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या अपघाती मृत्युने शहरात व शैक्षणिक वर्तळात हळहळ व्यक्त केली जात आहे. गडचिराेली शहरातील ट्रॅफिक अव्यवस्थेने आणखी एक बळी घेतल्याची चर्चा शहरवासीयांमध्ये हाेती. गडचिराेली पाेलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला असून ट्रकचालक प्रसाद मिश्रा याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.