काेराेनाच्या काळात आराेग्य सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST2021-04-07T04:37:41+5:302021-04-07T04:37:41+5:30
गडचिराेली : एकीकडे काेराेनावर मात करण्यासाठी राेगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा सल्ला दिला जातो, तर दुसरीकडे घराबाहेर फिरायला निघाल्यास काेराेनाचा संसर्ग हाेण्याची ...

काेराेनाच्या काळात आराेग्य सांभाळा
गडचिराेली : एकीकडे काेराेनावर मात करण्यासाठी राेगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा सल्ला दिला जातो, तर दुसरीकडे घराबाहेर फिरायला निघाल्यास काेराेनाचा संसर्ग हाेण्याची भीती वाढली आहे. अशी विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीतही आराेग्य सांभाळणे आवश्यक झाले आहे.
आहाराच्या माध्यमातून शरीराला ऊर्जा मिळते, तसेच शरीराच्या वाढीच्या दृष्टीने आहाराचे विशेष महत्त्व आहे. मात्र, हा आहार सात्त्विक असणे आवश्यक आहे. काेराेनाच्या संकटामुळे शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती निम्म्यावर आली आहे. समारंभांच्या उपस्थितीवर काही प्रतिबंध घातले आहेत. त्यामुळे बाहेरचे खाणे बंद झाले. ही जमेची बाजू आहे. मात्र, घरचेही जेवण घेताना त्यामध्ये विविध पाैष्टिक तत्त्वांचा समावेश असणे आवश्यक आहे. तळलेल्या पदार्थांमुळे आराेग्य बिघडण्याची शक्यता अधिक राहते.
सतत घरी राहण्यामुळे शरीराची हालचाल कमी हाेत असल्याने शरीर स्थूल हाेण्याची सर्वाधिक शक्यता राहते. बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे याेगा व व्यायाम करणे आवश्यक झाले आहे. काही नागरिक आपल्याकडे जागा नसल्याची तक्रार करतात. मात्र, याेगा किंवा व्यायाम करण्यासाठी फारशा जागेची गरज नाही. त्यासाठी इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. नियमित याेगा व व्यायामाच्या माध्यमातून स्वत:ला स्वस्थ ठेवणे शक्य आहे. शासनाने घातलेले निर्बंध यामुळे समाजात नकारात्मकता पसरून मानसिक आराेग्य धाेक्यात येण्याची शक्यता राहते. स्वत:ला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा. काेराेनामुळे अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. काही मजुरांची मजुरी बुडणार आहे. याचाही विपरीत परिणाम मनावर हाेतो. घरी राहून एखादा व्यवसाय करणे शक्य असल्यास तसा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे त्या व्यवसायात गुंतून राहता येईल. उद्भवलेल्या परिस्थितीला संधी माणून तिचे साेने करता येईल. काेराेनामुळे आराेग्याबाबत नागरिकांमध्ये बरीच जागृती निर्माण झाली आहे. यापूर्वी कधीही याेगा किंवा व्यायाम न करणाऱ्यांनी याेगा करण्यास सुरुवात केली आहे.
बाॅक्स...
साेशल मीडियातील नकारात्मकतेपासून दूर राहा
साेशल मीडियावर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे आपल्या व्हाॅट्सॲप, फेसबुक ॲपमध्ये आलेला संदेश खराच असेल, याची शाश्वती नाही. साेशल मीडियाच्या माध्यमातून बरेच नकारात्मक विचारांचे संदेश पसरविले जातात. असे संदेश वाचण्याचे टाळावे. सकारात्मक विचार असलेल्या नातेवाईक, सहकाऱ्यांसाेबत चर्चा करावी. काेराेनाच्या संकटामुळे केवळ आपलेच नुकसान हाेत नसून संपूर्ण जगाचेच नुकसान हाेत आहे. मात्र, प्रथम प्राधान्य जिवंत राहण्याला आहे. भविष्यात परिस्थिती सुधारेल, असा सकारात्मक विचार मनात कायमचा ठेवला पाहिजे.
बाॅक्स....
ज्येष्ठांनी स्वत:ला जपावे
काेराेनाचा सर्वाधिक धाेका ज्येष्ठ नागरिकांना असल्याचे आजपर्यंत सिद्ध झाले आहे. त्यामुळे काेराेना कालावधीत ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:ला जपणे आवश्यक झाले आहे. नियमित आहार-विहारावर भर द्यावा. काेराेनाच्या या नकारात्मक वातावरणात स्वत: व कुटुंबाला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा. ५० वर्षांपूर्वी आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची हाेती. अशाही परिस्थितीवर मात करीत आजपर्यंतचा प्रवास कसा केला, हा अनुभव कुटुंबाला सांगावा. पूर्वीच्या तुलनेत आपल्याकडे भरपूर आहे. हे विचार कुटुंबामध्ये रुजविण्यासाठी ज्येष्ठांनी प्रयत्न करावेत.
काेट....
याेगामुळे शारीरिक, मानसिक, बाैद्धिक व आध्यात्मिक विकास हाेण्यास मदत हाेते. याेगा करण्यासाठी केवळ तीन बाय सहा फुटाच्या जागेची गरज आहे. याेगा शक्यताे पहाटे किंवा सकाळी करावा. पहाटे ४ ते ६ या कालावधीत शुद्ध ऑक्सिजन मिळतो. या कालावधीत ऑक्सिजन जमिनीपासून अडीच ते तीन फूट अंतरावर राहतो. व्यक्तीची उंची पाच फुटाच्या वर राहत असल्याने शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही. मात्र याेगा करण्यासाठी बसावे लागत असल्याने ऑक्सिजन सहज उपलब्ध हाेतो. काेराेना काळातही गडचिराेली येथे ऑनलाइन याेगा मार्गदर्शन सुरू आहे. आहारात तेलयुक्त पदार्थांऐवजी फळे, हिरव्या भाज्यांचा वापर करावा.
- सत्यनारायण अनमदवार, याेग शिक्षक
काेट...
ज्येष्ठांनी स्वत:ला ताणतणावापासून दूर ठेवावे. विचार सकारात्मक राहतील, यासाठी प्रयत्न करावा. ज्येष्ठ नागरिक अतिशय कठीण व्यायाम करू शकत नाहीत. मात्र, सकाळ व सायंकाळी फिरायला जावे, हलकासा व्यायाम करावा. सर्व ज्येष्ठांसाठी काेराेनाची लस उपलब्ध आहे. प्रत्येकाने ही लस घ्यावी. आहार व विहारावर नियंत्रण ठेवल्यास सुदृढ राहून आयुष्य वाढविणे शक्य आहे.
- पांडुरंग घाेटेकर, जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संस्था, गडचिराेली