गृह अलगीकरणात असताना मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST2021-04-24T04:36:49+5:302021-04-24T04:36:49+5:30
देसाईगंज : शहरासह तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून, अवघ्या २० दिवसात जवळपास २७ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसागणिक कोरोनाचा ...

गृह अलगीकरणात असताना मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई करा
देसाईगंज : शहरासह तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून, अवघ्या २० दिवसात जवळपास २७ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, गृह अलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण मोकाट फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावून अनेकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा बाधित रुग्णांवर कारवाई करावी, अशी मागणी देसाईगंज सिटीझन फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
देसाईगंज तालुक्यात २० एप्रिलपर्यंत ३६० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी १२० कोरोनाबाधितांना गृह अलगीकरणात ठेवले आहे. दिनांक २१ एप्रिल रोजी एकाच दिवशी ७३ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले तर २३ एप्रिल रोजी ३७ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. शासकीय कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णांवर प्रशासनाची देखरेख असल्याने या माध्यमातून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत आहे. परंतु, गृह अलगीकरणात असलेले बाधित रुग्णच कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांना याबाबत माहिती देऊनही अद्यापही संबंधितांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. कोरोनाबाधित रुग्णांनी १४ दिवस अलगीकरणात राहून आरोग्य तपासणी करणे अनिवार्य असून, आरोग्य तपासणीत निगेटिव्ह आल्यासही काही दिवस नागरिकांच्या संपर्कात न येण्याच्या सूचना वजा निर्देश देण्यात आले आहेत. परंतु, गृह अलगीकरणात असलेले रुग्ण चक्क इतरही गावात फेरफटका मारून अनेकांच्या संपर्कात आल्याने स्थिती अधिकच बिकट हाेण्याची शक्यता आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा बाधित रुग्णांबाबत चौकशी करून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सिटीझन फोरमचे अध्यक्ष हितेश कनोजिया, उपाध्यक्ष रामलाल दुर्वा, गणपत देवढगले, राघवेंद्र शिंगणे, आदिराज श्रीवास्तव, बन्सी पडोळे, धर्मा वाघुंडे, इकबाल चौधरी, मुजफ्फर शेख यांनी केली आहे. गृह अलगीकरणातील व्यक्ती माेकाट फिरत असल्याची माहिती मिळाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे तहसीलदार संताेष महल्ले व तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. अभिषेक कुमरे यांनी सांगितले.