Symbolic movement of 'Take the sand' in Kurkheda | कुरखेडात ‘रेती लेके जाओ’ प्रतिकात्मक आंदोलन

कुरखेडात ‘रेती लेके जाओ’ प्रतिकात्मक आंदोलन

ठळक मुद्दे४० ट्रॅक्टर व १० बैलबंड्यांचा समावेश : सती नदीघाटावर सविनय कायदेभंग, अनोख्या आंदोलनातून वेधले शासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : सर्वसामान्य नागरिकांना शासकीय दरात आवश्यक तेवढी रेती उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी जि.प.चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात नागरिकांनी कुरखेडा येथील सती नदीघाटावर ट्रॅक्टर व बैलबंड्यांच्या सहाय्याने मंगळवारी सविनय कायदेभंग करत प्रतिकात्मक स्वरूपात ‘रेती लेके जाओ’ आंदोलन करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया रखडल्याने अनेक खासगी, शासकीय तसेच घरकुलांची कामे रखडली आहेत. या सर्व कामांकडे शासनाचे दुर्लक्ष असून शासनाकडून कोणतेही कार्यवाही व उपाययोजना होताना दिसून आली नाही. त्यामुळे जि.प.चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्वसामान्य नागरिकांना शासकीय दरात आवश्यक तेवढी रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीवर प्रशासनाच्या वतीने कोणतीही कारवाई न झाल्याने २२ सप्टेंबर रोजी मंगळवारला कुरखेडा शहराच्या सती नदी घाटावर सामुहिक रेती लेके जाओ आंदोलन करण्यात आले.
दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंदेल यांच्या नेतृत्वात ४० पेक्षा जास्त ट्रॅक्टर, १० बैलबंड्यांसह अनेक लोक सती नदी घाटावर पोहोचत प्रतिकात्मक स्वरूपात ट्रॅक्टर व बंड्यांमध्ये रेती भरून रेती लेके जाओ आंदोलन केले. यावेळी शासन व प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध करण्यात आला.
शासकीय दरात सर्वसामान्यांना रेती उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन रेती घाटावर उपस्थित नायब तहसीलदार विनोद बोडे यांच्याकडे देण्यात आले.
याप्रसंगी कुरखेडाचे पोलीस निरिक्षक सुधाकर देडे, सहायक पोलीस निरिक्षक समिर केदार उपस्थित होते. आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, सामाजिक कार्यकर्ते आशिष काळे, घिसू खुणे, कुंवर लोकेंद्रशहा सयाम, न.प. सभापती सोनू भट्टड, नगरसेवक पुंडलिक देशमुख, संजय देशमुख, अशोक कंगाली, राकेश चव्हाण, विजय पुस्तोडे, जयेंद्र चंदेल, खुशाल बन्सोड, दशरथ लाडे, जयंत बुध्दे, धर्मेंद्र परिहार, अशोक गायकवाड, कृष्णा पाटणकर, अनिल उईके, ललित मांडवे, भगवान नागपूरकर, राजू हरडे, दीपक मेश्राम, नाना झोडे, यशवंत झोडे, मुनिश्वर लांजेवार, देवानंद नाकाडे यांच्यासह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते.

जिल्हाधिकाऱ्यांना घेराव करणार
सर्वसामान्य लोकांसाठी निर्माण झालेला रेती तुटवड्याचा प्रश्न जिल्हा प्रशासनाने मार्गी न लावल्यास येत्या ६ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे जिल्हाधिकाºयांना घेराव आंदोलन करणार, असा इशारा जि.प.चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी तहसीलदारांमार्फत शासनाकडे पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

Web Title: Symbolic movement of 'Take the sand' in Kurkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.