स्वीटी बनली विक्रीकर आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:47 IST2018-06-03T23:47:47+5:302018-06-03T23:47:59+5:30
आरमोरी शहरात वास्तव्यास असलेली स्वीटी यादव लोणारे हिने सन २०१७ च्या महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. स्विटीची सहायक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाने गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी शहराचा नाव लौकीक झाला आहे. आरमोरी शहरातून मोठी अधिकारी बनणारी स्वीटी ही पहिलीच मुलगी आहे.

स्वीटी बनली विक्रीकर आयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी शहरात वास्तव्यास असलेली स्वीटी यादव लोणारे हिने सन २०१७ च्या महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. स्विटीची सहायक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाने गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी शहराचा नाव लौकीक झाला आहे. आरमोरी शहरातून मोठी अधिकारी बनणारी स्वीटी ही पहिलीच मुलगी आहे.
स्वीटी लोणारे हिचे वडील यादव लोणारे हे आरमोरी तालुक्याच्या वडधा येथील किसान विद्यालयात सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहे. तर आई गृहिणी आहे. स्वीटीचा भाऊ अभियांत्रिकेचे शिक्षण घेत आहे. स्वीटीने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण आरमोरी येथील डॉ. आंबेडकर विद्यालयातून पूर्ण केले. इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत तिसरी आली होती. त्यानंतर तिने इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयातून पूर्ण केले. इयत्ता बारावीत बोर्डाच्या परीक्षेत ब्रह्मपुरी तालुक्यातून प्रथम आली होती. दहावी व बारावीमध्ये गुणवत्तेत प्रथम आल्याने सत्कार समारंभामध्ये तिला स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे स्वीटीने बीटेकचे शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही सुरू केला. मोठी अधिकारी बनायची इच्छा असल्याचे स्वीटीने आपल्या आई-वडिलाला सांगितले होते. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या दिशेने ती वळली. अहोरात्र परीश्रम करून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. २०१६ मध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सुरूवातीला तिची आरएफओ म्हणून निवड झाली. यासोबतच तिने २०१७ मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली. ३० मे रोजी लागलेल्या एमपीएससी परीक्षेच्या निकालात तिने यश मिळविले. तिची सहायक विक्रीकर आयुक्त वर्ग १ या पदावर नियुक्ती झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने व आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने हे यश आपण मिळवू शकले, असे स्विटी म्हणाली.