प्राणहिताकाठी ‘स्वच्छतेची वारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 05:00 AM2022-04-20T05:00:00+5:302022-04-20T05:00:34+5:30

या स्वच्छता मोहिमेमुळे आता भाविकही निर्माल्य व इतर कचरा कचराकुंडीतच टाकताना दिसत आहेत. सिरोंचा घाटावर विविध दुकाने लागली आहेत. त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सावलीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थांकडून आहार वितरित केला जात आहे. यामुळे परिसरात कचरा निर्माण होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा उचलणे शक्य नाही.

'Swachhtechi Wari' for the sake of life | प्राणहिताकाठी ‘स्वच्छतेची वारी’

प्राणहिताकाठी ‘स्वच्छतेची वारी’

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : येथे १२ वर्षांनंतर भरलेल्या पुष्कर मेळ्यात दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या पूजा-अर्चेनंतर नदीपात्र आणि काठावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य व कचरा जमत आहे. हा कचरा सर्वत्र पसरत असल्याने त्यातून अस्वच्छता निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पुष्करचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या संकल्पनेतून सर्व शासकीय विभागांनी मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविली. विशेष म्हणजे यात जवळपासच्या शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.
यात सिरोंचातील राजे धर्मराव महाविद्यालय, सी.व्ही. रमण महाविद्यालय, भगवंतराव कला महाविद्यालय, अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूल, तसेच सिरोंचा सेवा समिती यांनी नदी घाट स्वच्छ करण्यासाठी सहभाग घेतला. तसेच यापूर्वी शासनाच्या महसूल, बांधकाम विभाग, कृषी विभाग व नगर पंचायत विभागाने स्वच्छता मोहीम राबविली होती. यामुळे जणू काही स्वच्छतेची वारीच प्राणहिताकाठी आल्याचे चित्र दिसत होते.
या स्वच्छता मोहिमेमुळे आता भाविकही निर्माल्य व इतर कचरा कचराकुंडीतच टाकताना दिसत आहेत. सिरोंचा घाटावर विविध दुकाने लागली आहेत. त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सावलीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थांकडून आहार वितरित केला जात आहे. यामुळे परिसरात कचरा निर्माण होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा उचलणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनाही स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी जनजागृती करणारा हा उपक्रम धनाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. त्यासाठी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी योग्य नियोजन करून स्वच्छतेसाठी विविध संस्था, शाळांना एकत्रित आणले.

 अन् नदीकाठावरील  पाणी झाले स्वच्छ 
नदीतील गढूळ पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी नवीन मोटार पंप लावून त्याठिकाणी भाविकांना स्वच्छ पाण्यात आंघोळ करता येईल, अशी सोय करण्यात आली आहे. भाविकांना नदीपात्रात आंघोळ करण्यास अडचण येत असल्यास त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. परंतु नदीपात्रातील गर्दीमुळे बाहेर येणारे पाणीही गढूळ येत होते. ही समस्या दूर करण्यासाठी आता घाटापासून थोडे दूरचे पाणी स्वतंत्र पंपाद्वारे आंघोळीसाठी उपलब्ध केले जात आहे.

 

Web Title: 'Swachhtechi Wari' for the sake of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.