गडचिरोली - दंडकारण्यात गेली अनेक दशके समांतर सत्ता राबवणारा आणि १ कोटीहून अधिक रुपयांचे इनाम शिरावर असलेला छत्तीसगडचा कुख्यात नक्षलवादी कमांडर सुन्नम पापाराव उर्फ ‘मंगू दादा’ सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण वळणावर उभा आहे. एका बाजूला सुरक्षा दलांच्या बंदुकांच्या नळ्या आणि दुसरीकडे ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी , एसपी यांनी थेट त्याच्या घराचा उंबरठा ओलांडून आत्मसमर्पणासाठी घातलेली साद, अशा दुहेरी कात्रीत तो अडकला आहे.
छत्तीसगडच्या जगदलपूर जिल्ह्याच्या बस्तर या नक्षलग्रस्त भागात सध्या सुरक्षा यंत्रणांकडून जोरदार मोहीम सुरू आहे. छत्तीसगडच्या १३० जहाल माओवाद्यांनी ७ मार्च रोजी हैद्राबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यापुढे शस्त्रासह शरणागती पत्करली. यानंतर दुसऱ्याच दिवशी नक्षल कमांडर सुन्नम पापा राव उर्फ मंगू दादा याच्या घरी जगदलपूरचे जिल्हाधिकारी आकाश छिकारा व पोलिस अधीक्षक जितेंद्र सिंह मीना यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी त्याच्या आईसह कुटुंबाशी चर्चा करून पापाराव यास तातडीने शरण यायला सांगा असा संदेश दिला. अन्यथा माओवादविरोधी मोहीम तीव्र स्वरूपात सुरू असल्याने गंभीर परिणामास सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा दिला.
मृत्यूच्या वावड्या, पण प्रत्यक्षात जिवंत काही महिन्यांपूर्वी पापाराव चकमकीत मारला गेल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, तो आजही सशस्त्र तुकडीसह सक्रिय असल्याचे समोर आल्याने सुरक्षा यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत. पश्चिम बस्तरचा सूत्रधार असलेल्या पापारावने गनिमी काव्याच्या जोरावर अनेकदा मृत्यूला चकवा दिला आहे. चकमकीत पत्नी उर्मिलाला गमावल्यानंतरही जंगलाचा रस्ता न सोडणारा हा नक्षलवादी आता मात्र संघटनेच्या खिळखिळ्या झालेल्या फळीमुळे एकाकी पडताना दिसत आहे.
२०२६ चे लक्ष्य आणि अंतिम प्रहारगृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा दलांनी २०२६ च्या सुरुवातीलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. डीआरजी आणि विशेष पथकांनी पापारावसाठी सापळा लावून त्याला कुठल्याही स्थितीत अटकाव करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या नक्षल संघटनेत केवळ गणपती आणि मिशीर बेसरा यांसारखी जुनी जाणती नावे उरली असून, मधल्या फळीतील पापारावसारख्या नेत्याचे पतन होणे म्हणजे चळवळीचा अंत मानला जात आहे.
कुटुंबाची ओढ की वैचारिक अट्टाहास?पापारावची पत्नी उर्मिला देखील चळवळीत होती. ती चकमकीत ठार झाली, तरीही मृत्यूच्या दारातून तब्बल पाच वेळा सुरक्षित पळ काढण्यात तो यशस्वी झाला. पत्नीचा मृत्यू आणि कुटुंबाने घातलेली साद त्याचे हृदय परिवर्तन करणार, की दंडकारण्याच्या जंगलातच तो आपल्या हिंसक प्रवासाचा अंत ओढवून घेणार? हे लवकरच कळेल.पापारावची अशी आहे गुन्हे कुंडली पापाराव हा अतिशय धूर्त आणि दंडकारण्याच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास असलेला जहाल कमांडर आहे. दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा या कणा असून त्याच्यावर सुरक्षा दलांवरील हल्ले, आयईडी स्फोट आणि हत्येसारखे १०० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बस्तर आणि सीमावर्ती भागात झालेल्या अनेक मोठ्या घातपातांचा तो मुख्य सूत्रधार आहे. सदैव एके - ४७ व अत्याधुनिक शस्त्रांसह वावरणारा पापाराव सुरक्षा यंत्रणेसाठी मोस्ट वॉन्टेड नक्षल नेता आहे.
Web Summary : Feared Naxal commander Paparao faces a tough choice: surrender or face security forces. Authorities contacted his family, urging his surrender amid intensified anti-Naxal operations. He is wanted for numerous attacks.
Web Summary : कुख्यात नक्सली कमांडर पापाराव के सामने कठिन विकल्प: आत्मसमर्पण या सुरक्षा बलों का सामना। अधिकारियों ने उसके परिवार से संपर्क किया, नक्सल विरोधी अभियानों के बीच आत्मसमर्पण करने का आग्रह किया। वह कई हमलों के लिए वांछित है।