नक्षलविरोधी अभियानातील यशाने पोलिसांचे मनोधैर्य वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:21 IST2017-12-07T23:21:19+5:302017-12-07T23:21:38+5:30
गेल्या १५ दिवसात नक्षल्यांनी हिंसक घटना करीत चार नागरिक आणि दोन पोलीस दलातील जवानांची हत्या केल्यानंतर हादरून गेलेल्या पोलीस यंत्रणेचे मनोधैर्य आता पुन्हा वाढले आहे.

नक्षलविरोधी अभियानातील यशाने पोलिसांचे मनोधैर्य वाढले
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : गेल्या १५ दिवसात नक्षल्यांनी हिंसक घटना करीत चार नागरिक आणि दोन पोलीस दलातील जवानांची हत्या केल्यानंतर हादरून गेलेल्या पोलीस यंत्रणेचे मनोधैर्य आता पुन्हा वाढले आहे. दुसरीकडे नक्षलवाद्यांना चांगलाच हादरा बसला आहे.
बुधवारी ७ नक्षलवाद्यांना मारण्यात पोलिसांना यश आल्यानंतर गुरूवारी दोन दलम सदस्य असलेल्या युवा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. गेल्या २ डिसेंबरपासून नक्षलवाद्यांचा पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाचा समारोप शुक्रवार दि.८ ला होणार आहे. सप्ताहाच्या आधीच नक्षलवाद्यांनी सतत हिंसक घटना घडविल्याने पीएलजीए सप्ताहात काय होणार याबाबत नागरिकांमध्ये दहशत होती. एवढेच नाही तर पोलिसांनीही नक्षल्यांच्या हत्यासत्राचा धसका घेतला होता. त्यामुळे अपर पोलीस महासंचालक डी.कनकरत्नम, पोलीस महानिरीक्षक शरद शेलार, उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे हे गडचिरोलीत तळ ठोकून होते. येथूनच त्यांनी नक्षल्यांविरूद्ध कशी आणि कुठे मोहीम राबवायची याची रणनिती आखली. त्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचीही मदत घेतली. नक्षल्यांशी लढण्याचा अनुभव असणाऱ्या छत्तीसगडमधील कोब्रा बटालियनला आधीच गडचिरोलीत पाचारण करण्यात आले होते.
या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण नक्षल्यांना संपूर्ण सप्ताहभर कोणत्याही हिंसक कारवाया यशस्वी करता आल्या नाहीत.