पोर्ला येथे बससाठी विद्यार्थ्यांचा महामार्गावर ठिय्या, वाहतूक ठप्प : पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:22 IST2025-12-23T12:21:58+5:302025-12-23T12:22:22+5:30
पोर्ला परिसरातून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी आरमोरी व देऊळगावकडे शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र, बस नियमित न थांबल्याने विद्यार्थ्यांना तासन्तास रस्त्यावर प्रतीक्षा करावी लागत आहे.

पोर्ला येथे बससाठी विद्यार्थ्यांचा महामार्गावर ठिय्या, वाहतूक ठप्प : पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
गडचिरोली : बससेवा व बसथांब्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यात किटाळी येथे झालेल्या आंदोलनानंतरही प्रत्यक्षात कोणताही बदल न झाल्याने २३ डिसेंबर रोजी पोर्ला (ता. गडचिरोली) येथे आरमोरी महामार्गावर शाळकरी विद्यार्थ्यांनी चक्काजाम आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. दुतर्फा वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले.
पोर्ला परिसरातून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी आरमोरी व देऊळगावकडे शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र, बस नियमित न थांबल्याने विद्यार्थ्यांना तासन्तास रस्त्यावर प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी शाळा-महाविद्यालयीन वर्ग बुडत असून परीक्षेच्या काळात शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला. शिवाय या परिसरात वाघाचीही दहशत आहे.
आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्यांशी चर्चा करून बससेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चक्काजाम मागे घेण्यात आले.
किटाळी आंदोलनाची आठवण
किटाळी येथे विद्यार्थ्यांनी बसथांब्यासाठी १७ डिसेंबर रोजी महामार्ग रोखला होता. प्रशासनाने तातडीने बस थांबविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक गावांत आजही बस न थांबण्याचीच स्थिती आहे. त्यामुळे पोर्ला येथील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.