पहिलीतील विद्यार्थ्याच्या डोळ्यात भोसकली पेन्सिल; शस्त्रक्रियेनंतरही दृष्टी धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 14:16 IST2022-11-25T14:16:01+5:302022-11-25T14:16:26+5:30
घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

पहिलीतील विद्यार्थ्याच्या डोळ्यात भोसकली पेन्सिल; शस्त्रक्रियेनंतरही दृष्टी धोक्यात
सिरोंचा (गडचिरोली) : तालुक्यातील राजीवनगर येथील कार्मेल अकादमीमध्ये पहिल्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने त्याच वर्गात शिकत असलेल्या सात्विक रमेश मारगोनी या विद्यार्थ्याच्या डोळ्यात पेन्सिलने भोसकल्याने सात्विक याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी दुपारी शाळेत घडली.
शाळेला सुट्टी झाल्यानंतर वडील मुलास शाळेत आणण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी ताबडतोब मुलाला सिरोंचा येथील डॉक्टरांकडे नेले. मात्र, डोळ्यात गंभीर जखम झाल्याने तेथून तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथील एका मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले.
चाचणीनंतर डॉक्टरांनी त्यांना हैदराबाद येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्याला ऑपरेशनचा करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर डॉक्टरांनी तब्बल दोन तास शस्त्रक्रिया केली. मात्र, दृष्टी पूर्ववत येईल, याची खात्री नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे सर्व पालकांनी शाळेबद्दल रोष व्यक्त करत सदर घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.