शिक्षणासाठी धडपड, बांबूच्या झाल्या भिंती, झाडाचा झाला फळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 13:44 IST2022-09-21T13:41:55+5:302022-09-21T13:44:08+5:30

बांबूपासून बनविलेल्या भिंती व ताडीच्या झाडाच्या बुंध्याचा फळ्यासारखा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आटापिटा सुरू आहे.

Struggle for education, bamboo walls, tree fruits! | शिक्षणासाठी धडपड, बांबूच्या झाल्या भिंती, झाडाचा झाला फळा !

शिक्षणासाठी धडपड, बांबूच्या झाल्या भिंती, झाडाचा झाला फळा !

रवी रामगुंडेवार

एटापल्ली (जि. गडचिरोली) : शाळांच्या इमारती विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य नाहीत. जीर्ण, धोकादायक  इमारतींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण वंचित राहू नये म्हणून नवा प्रयोग एटापल्ली तालुक्यातील वाळवी गावात सुरू आहे. 

बांबूपासून बनविलेल्या भिंती व ताडीच्या झाडाच्या बुंध्याचा फळ्यासारखा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आटापिटा सुरू आहे.   
गट्टा केंद्रांतर्गत वाळवी या दुर्गम गावात जिल्हा परिषदेची एकशिक्षकी शाळा आहे. या छोट्या गावात आदिवासींमधील माडिया जमातीची जेमतेम ३० ते ४० कुटुंबं आहेत. चारही बाजूंनी घनदाट जंगल. गावात जायला  पायवाट हाच पर्याय. पावसाळ्यात तर पाण्यातून वाट काढत गावात पोहोचणे म्हणजे जीवाची कसरतच. अशातही गावात वर्ग १ ते ४ पर्यंतची शाळा भरते; पण भौतिक सुविधा नसतानाही शिक्षक, गावकऱ्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून अडचणींवर मात केली आहे.

जीर्ण इमारतीवर शोधला पर्याय
धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांचे वर्ग भरविणे जिकिरीचे. हे ओळखून वाळवीचे ग्रामस्थ आणि मुख्याध्यापक श्रीकांत काटेलवार यांनी गावातील ‘गोटूल’मध्ये शाळा भरविण्याचे ठरविले. गावातील सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे हे
छोटेसे समाजभवन म्हणजेच गोटूल. गावकऱ्यांनी गोटूलरुपी भवनाला सजवून शाळेचे रूप दिले.

नवीन रूप भावले
ताडीच्या झाडांपासून तयार केलेली वैविध्यपूर्ण,  विनाखर्चाची पण टिकाऊ  शैक्षणिक साधने गोटूलमध्ये लावण्यात आली. शब्दांचे झाड, स्मृतिशेष फलक गोटूलची शोभा वाढविण्याबरोबर विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य वाढवितात. ही मिनी शाळा पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे.

Web Title: Struggle for education, bamboo walls, tree fruits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.