भरधाव दुचाकी ट्रकवर धडकली, तीन तरुण जागीच ठार
By संजय तिपाले | Updated: January 10, 2024 13:32 IST2024-01-10T13:31:00+5:302024-01-10T13:32:03+5:30
गडचिरोली शहराजवळील घटना : जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

भरधाव दुचाकी ट्रकवर धडकली, तीन तरुण जागीच ठार
संजय तिपाले, गडचिरोली: भरधाव दुचाकी समोरुन येणाऱ्या मालवाहू ट्रकवर आदळल्याने तीन तरुण जागीच गतप्राण झाले. ही घटना ९ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता चंद्रपूर रोडवरील मुरखळा गावानजीक घडली. मृत तरुणांचे वय जेमतेम २० ते २३ इतके असून ते एकमेकांच्या नात्यातील आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार,अक्षय दसरथ पेंदाम (२३), अजित रघू सडमेक (२३), अमोल अशोक अर्का (२०, सर्व रा. गोविंदगाव ता.अहेरी) अशी मृत तरुणांची नावे आहेत. ९ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजे सुमारास तिघे नव्या कोऱ्या दुचाकीवरून गडचिरोलीच्या दिशेने येत होते. मुरखळा गावाजवळच्या वळणावर समोरुन येणाऱ्या ट्रकवर त्यांची दुचाकी धडकली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचा चक्काचूर झाला. घरातील तरुण मुलांच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबीयांनी केलेल्या आक्रोशाने वातावरण सुन्न झाले होते. १० जानेवारी रोजी सकाळी उत्तरीय तपासणी करुन तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.