पुस्तके छापण्याच्या हालचालींना वेग

By Admin | Updated: June 21, 2014 01:39 IST2014-06-21T01:39:27+5:302014-06-21T01:39:27+5:30

बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे आहे.

The speed at the printing presses | पुस्तके छापण्याच्या हालचालींना वेग

पुस्तके छापण्याच्या हालचालींना वेग

गडचिरोली : बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे आहे. या पुस्तका छापण्यासाठी निविदा काढण्यात आली असून पहिल्यांदाच यावर्षी २६ जून किंवा १ जुलैपर्यंत पुस्तके मिळणार असल्याचा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मुलचेरा, चामोर्शी या दोन तालुक्यांमध्ये बंगाली समाजाच्या नागरिकांची संख्या बऱ्यापैकी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण मिळावे, असे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार बंगाली समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बंगाली माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात मिळून सुमारे ४६ बंगाली माध्यमाच्या प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे ५ हजार ८२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
१ ते ८ पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचा मोफत पुरवठा करण्यात येतो. मात्र बंगाली माध्यमाच्या शाळा केवळ गडचिरोली जिल्ह्यातच असल्याने या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या मार्फतीने निविदा मागावून पाठ्यपुस्तके छापली जातात. मात्र यासाठी दरवर्षीच उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांना नेहमी दिवाळीनंतरच नवीन पुस्तके हाती पडत असल्याचा अनुभव आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना जुन्या फाटलेल्या पुस्तकातूनच अध्ययन करावे लागते. बऱ्याचवेळा केवळ शिक्षकाकडे एक पुस्तक राहते व विद्यार्थ्यांना मात्र पुस्तकाअभावीच अध्ययन करावे लागत असल्याचा आजपर्यंतचा कटू अनुभव बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना आहे. एखाद्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर सदर अभ्यासक्रम बंगाली माध्यमामध्ये भाषांतरीत करावा लागतो. ही पुस्तके तर छापण्याला अक्षम्य उशीर होत असल्याचाही आजपर्यंत दिसून आले आहे.
यावर्षी पहिल्यांदाच शिक्षण विभागाने बंगाली विद्यार्थ्यांच्या हातामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पुस्तके हातामध्ये पडाव्या यासाठी मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच नियोजन केले आहे. तिसऱ्या व चौथ्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलला असल्याने या अभ्यासक्रमांचे भाषांतराचे काम पूर्ण झाले आहे. पुस्तक छापण्यासाठी जवळपास अडीच ते तीन लाख रूपयाचा खर्च येणार असल्याने हे सर्व काम ई-निविदा काढून करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने ई-निविदा मागितल्या असून कंत्राटदारांना वर्क आॅर्डर देऊन २६ जून पूर्वीच पुस्तके छापून घेण्यात येतील. थोडाफार उशीर झाला तरीही १ जुलैपूर्वी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

Web Title: The speed at the printing presses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.