आजपासून विशेष मोहीम
By Admin | Updated: August 24, 2014 23:29 IST2014-08-24T23:29:00+5:302014-08-24T23:29:00+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत यंदाच्या पावसाळ्याच्या हंगामात तसेच मागील तीन वर्षात ग्रामपंचायतीमार्फत लागवड करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी

आजपासून विशेष मोहीम
ग्रामपंचायतीच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाची तपासणी होणार
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत यंदाच्या पावसाळ्याच्या हंगामात तसेच मागील तीन वर्षात ग्रामपंचायतीमार्फत लागवड करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत उद्या २५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत केली जाणार आहे. या विशेष तपासणी मोहिमेत शिक्षकांचाही समावेश राहणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०११ ते २०१४ या वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायतीच्यावतीने मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात वृक्ष लागवड करण्यात आली. यापैकी अनेक वृक्ष उन्हाच्या दहाकतेमुळे कोमेजली आहेत तर काही नष्ट झाली आहे. ५० ते ६० टक्के वृक्ष जिवंत असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून दिसून येते. ग्रामपंचायतीच्यावतीने लावण्यात आलेल्या वृक्षाचे गुरे, ढोरे व जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी कुंपणाची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे बहुतांश गावातील काही झाडे नष्ट झाल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमातील नेमके किती झाडे जिवंत आहेत, हे पाहण्यासाठी शासनाने विद्यार्थी व शिक्षक यांच्या मार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात राज्य शासनाने १९ आॅगस्ट २०१४ रोजी नवे परिपत्रक काढून २५ आॅगस्ट २०१४ ते १५ सप्टेंबर २०१४ या कालावधीत विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
या तपासणी कार्यक्रमाचे संयनियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत. तीन आठवड्याच्या या कालबद्ध कार्यक्रमात सामाजिक वनीकरण विभागाच्या उपसंचालकाची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. महाराष्ट्र शासन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ३०१४ पत्र क्रमांक ५७ नियोजन विभागाच्या १९ आॅगस्ट २०१४ च्या परिपत्रकानुसार एक शिक्षक व दोन विद्यार्थी यांचा समावेश असलेल्या हरित संरक्षक गटांकडून ही तपासणी केली जाणार आहे. सदर विशेष मोहीम सुटीच्या दिवशी अथवा नियोजित शाळेची वेळ संपल्यानंतर करावी लागणार आहे.
एक ग्रामपंचायत, एक काम यासाठी शिक्षकाला ३०० रूपये तर विद्यार्थ्याला १५० रूपये मानधन दिले जाणार आहे. एका ग्रामपंचायतीतील तीन कामांची तपासणी केलेल्या शिक्षकाला ४०० रूपये आणि विद्यार्थ्याला २०० रूपये मानधन दिले जाणार असल्याचे १९ आॅगस्टच्या परिपत्रकात नमूद आहे. मानधनाची ही रक्कम संबंधित शिक्षक तसेच विद्यार्थ्यांच्या बँक अथवा पोस्ट खात्यात जमा होणार आहे. तपासणी भेटी सुरू होण्यापूर्वी पंचायत समितीस्तरावर अहवाल भाग १ भरण्यात येणार आहे. या कामासाठी कृषी अधिकारी व एक कंत्राटी अधिकारी निश्चित करण्यात आले आहे. या तपासणी मोहीम कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी तर सदस्य म्हणून जि. प. चे उपमुख्य कार्यकारी (ग्रामपंचायत), उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक म्हणून रोहयोचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी व सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक यांचा समावेश राहणार आहे.
या विशेष तपासणी मोहिमेचा उद्देश ग्रामपंचायतीमार्फत संबंधीत गावात वृक्ष लागवड झाली अथवा नाही, जिवंत व मृत रोपट्यांची संख्या किती हे कळणार आहे. तसेच वृक्षाच्या पुनर्रलागवडीसाठी कृती केल्या जाणार आहे. एकंदरीतच पर्यावरणाचा समतोल कायम राहावा, तसेच हवामान चांगले राहावे यासाठी रोहयोंतर्गत गेल्या तीन वर्षापासून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीमार्फत लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची तपासणी शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे दोनही घटक प्रशासनापासून स्वतंत्र आहेत. यामुळे ही तपासणी मोहीम निरपेक्ष व प्रभावी होण्याची दाट शक्यता आहे. या तपासणी मोहिमेसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व गावकरी तयार झाले आहेत. मात्र कोणत्या शाळेचे शिक्षक व विद्यार्थी कोणत्या गावात जाऊन वृक्ष लागवड कार्यक्रमाची तपासणी करणार आहेत, हे सध्या गुलदस्त्यात आहे. जि. प. प्रशासनात या मोहिमेच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोणते गाव कोणत्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना तपासणीसाठी द्यावे हे ठरणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)