एक टक्का क्षेत्रावरच पेरणी
By Admin | Updated: July 1, 2014 23:28 IST2014-07-01T23:28:50+5:302014-07-01T23:28:50+5:30
जुलै महिन्याला सुरूवात होऊनही उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन तापत असल्याने पेरणीचे कामे खोळंबली आहेत. आतापर्यंत केवळ १ टक्का क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हामुळे पेरलेली बियाणेही धोक्यात आली आहेत.

एक टक्का क्षेत्रावरच पेरणी
शेतकरी संकटात : पेरलेले बियाणेही धोक्यात
गडचिरोली : जुलै महिन्याला सुरूवात होऊनही उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन तापत असल्याने पेरणीचे कामे खोळंबली आहेत. आतापर्यंत केवळ १ टक्का क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हामुळे पेरलेली बियाणेही धोक्यात आली आहेत.
कृषी विभागाने यावर्षी खरीप हंगामात १ लाख ६६ हजार ८० हेक्टरवर पिकांची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. यासाठी आवश्यक असलेले बियाणे व खते उपलब्ध व्हावे, यासाठी उन्हाळ्यातच नियोजन करून प्रत्येक शेतकऱ्याला पुरेसे बियाणे व खते उपलब्ध करून दिले. मात्र पावसाच्या आगमनास उशीर झाला आहे. पावसाने कायमची दडी मारल्याने बियाण्यांची पेरणी करण्यास शेतकरी वर्ग तयार नाही. जिल्ह्यात एकूण १ लाख ४९ हजार २६० हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी ५४ हजार ४६० हेक्टरवर आवत्या व ९४ हजार ८०० हेक्टरवर धानाची रोवणी करण्यात येणार आहे. रोवणीसाठी पऱ्हे आवश्यक आहेत. केवळ २ हजार ६८७ हेक्टरवर पऱ्हे टाकण्यात आले आहेत. तर १ हजार ४०४ हेक्टरवर आवत्या टाकण्यात आला आहे. ६ हजार ३२० हेक्टरवर सोयाबीन पिकाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. १ हजार २८० हेक्टरपैकी ४६ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. तुरीच्या ४ हजार २६० हेक्टरपैकी ४५५, तिळाच्या ७०० हेक्टरपैकी ८ हेक्टरवर बियाण्यांची पेरणी करण्यात आली आहे.
पेरणीला उशीर झाल्यानंतर उत्पादनात घट होते. हा शेतकऱ्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन कमीच होईल. या चिंतेने शेतकरी वर्ग ग्रासला आहे. कर्जाचे डोंगर कसे फेडावे, अशी चिंता निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)