सफाई कामगारांच्या समस्या सोडवा
By Admin | Updated: August 20, 2014 23:32 IST2014-08-20T23:32:40+5:302014-08-20T23:32:40+5:30
नगर परिषद गडचिरोली येथे सफाई कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, या मागणीला घेऊन प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांच्या नेतृत्वात कामगारांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे

सफाई कामगारांच्या समस्या सोडवा
गडचिरोली : नगर परिषद गडचिरोली येथे सफाई कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, या मागणीला घेऊन प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांच्या नेतृत्वात कामगारांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदेतील सफाई कामगारांना महाराष्ट्र शासनाने किमान वेतन घोषित केले असले तरी, महाराष्ट्र शासनाचा किमान वेतन कायदा पायतळी तुडविला जात आहे. नगर परिषदेच्या सफाई कामगारांना २६० रूपयांऐवजी १६० रूपये मजुरी दिली जात आहे. कोऱ्या पगार पत्रकावर सह्या घेऊन पगार पत्रक तयार केले जात असल्याचा आरोपही प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केला आहे. कामगारांना बँकेमार्फत वेतन अदा केले जावे, अशी मागणीही दहीवडे यांनी केली आहे. नगर परिषदेचे सफाई कामगार अल्पशा वेतनावर सफाईचे करीत आहेत. मात्र त्यांना अतिशय कमी वेतन दिल्या जाते. सफाई कामागारांना किमान वेतन देण्याचे नगर परिषदेने जाहीर केले असतांनाही अजूनपर्यंत किमान वेतन का लागू करण्यात आले नाही, असा सवालही दहीवडे यांनी उपस्थित केला आहे. नगर परिषदेच्या सफाई कामगारांच्या वेतनाचा प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी सफाई कामगारांच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देतांना शिष्टमंडळात राहूल गावतुरे, तुकाराम कारमेंगे, बादल कुळमेथे, रमेश ठाकरे, प्रकाश बुरांडे, विनोद टेकाम, किशोर मोगरकर आदींचा समावेश होता.